• Mon. Nov 25th, 2024

    गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! POP की शाडूची गणेशमूर्ती, पुणे महापालिकेचा निर्णय काय?

    गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! POP की शाडूची गणेशमूर्ती, पुणे महापालिकेचा निर्णय काय?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या गणेशमूर्ती वापरण्यावर बंदी असल्याने नागरिकांनी या मूर्तींची खरेदी करू नये,’ असे आवाहन महापालिकेने केले आहे. या मूर्तींऐवजी शाडू किंवा चिकणमातीने तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदी कराव्यात, असे पालिकेने म्हटले आहे.

    अद्यापही अनेक नागरिक वाहत्या पाण्यात किंवा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. ‘पीओपी’च्या मूर्ती व त्यातील विषारी रंग पर्यावरणास धोकादायक असतात. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती कारागीर आणि उत्पादकांसाठी मे २०२०मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणाऱ्या गणेश मूर्तीकार किंवा व्यावसायिकांकडूनच मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

    नैसर्गिक जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल शाडू माती, चिकणमातीने गणेश मूर्ती तयार कराव्यात. कोणताही विषारी अजैविक कच्चा माल; तसेच पीओपी, पॉलिस्टीरिन यांचा वापर करू नये. मूर्तीचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढ्यांचाच वापर करावा. मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने, रेझिन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर करावा, असे महापालिकेच्या परिपत्रकात म्हटले आहे.

    मूर्ती रंगविण्यासाठी पाणी आधारित रंग, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगांचा वापर करावा. विषारी आणि अविघटनशील रासायनिक रंग, ऑइल पेंट्स, ‘इनॅमल’चा वापर करता येणार नाही. नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून तयार केलेले व काढता येण्याजोगे आणि धुता येतील असे सजावटीचे कपडे वापरावे. रंगविण्यासाठी फक्त नैसर्गिकरित्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग, खनिज किंवा रंगीत खडक यांचाच वापर करावा, असेही पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
    Ganeshotsav 2023 : शाडू गणेशमूर्तीसाठी मूर्तिकरांना माती अन् जागा BMC देणार, कुठे कराल अर्ज?
    दरम्यान, गेल्या वर्षीही शहरात ‘पीओपी’मुक्त गणेशोत्सवाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेने काही दिवसांपूर्वीच ‘पीओपी’च्या मूर्ती वापरू नयेत, असे आदेश काढले आहेत. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असताना व मूर्ती घडविण्याचे काम वेगाने सुरू असताना पुणे महापालिकेने मात्र, कोणतेही आदेश काढले नसल्याने पालिकेच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अखेर पालिकेने याबाबतचे आवाहन प्रसिद्ध केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed