• Sat. Sep 21st, 2024

‘जिल्हास्तर युवा पुरस्कारा’साठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

ByMH LIVE NEWS

Jul 10, 2023
‘जिल्हास्तर युवा पुरस्कारा’साठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

मुंबई दि. १० : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज २५ जुलै २०२३ पर्यंत सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन  २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाकरिता प्रत्येकी २ युवक, २ युवती आणि २ संस्था असे प्रतिवर्षी एकूण ०६ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष :

(अ) युवक/युवती पुरस्कार

(१) पुरस्कारवर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय १३ वर्ष पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.

(२) अर्जदार हा मुंबई शहर जिल्ह्यात सलग ५ वर्षे वास्तव्यास असला पाहिजे.

(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्र इ. जोडावेत.

(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

(ब) संस्था युवा पुरस्कार

(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.

(२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार नोंदणीकृत असावी.

(३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे इ. जोडावेत. वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज पाठविण्याची मुदत वाढवली असून इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज, दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल – दुसरा मजला धारावी पश्चिम मुंबई ४०००१७ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ८४५९५८५८४१ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

राजू धोत्रे /वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed