ओंकार गायकवाड (वय २४, सध्या रा. चाकण, खेड, पुणे, मूळ रा. पारनेर) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. ओंकार शुक्रवारी दुपारी मित्रांबरोबर वर्षाविहारासाठी तळेगावजवळील कुंडमळा येथे आला होता. पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी ओंकार उतरला. मात्र, पाण्याला वेग असल्याने तो वाहून गेला. मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले; पण पाण्याच्या प्रवाहामुळे त्याला शोधणे शक्य झाले नाही.
ओंकार गेल्याची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मावळ तालुका वन्यजीव रक्षक संघटना, लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळाच्या आपत्कालीन पथकातील सुनील गायकवाड, महेश मसने, सचिन गायकवाड, राजेंद्र कडू, अनिल आंद्रे यांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळपासून शोध मोहीम सुरू केली. रात्री अंधार पडल्यानंतर शोध मोहीम थांबवली होती. शनिवारी दिवसभर ओंकारचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते; पण रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. कुंडमळा येथे ओमकार वाहून गेला, तेथून पुढील काही भागांत त्याचा शोध सुरू आहे. मात्र, शनिवारीदेखील उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
कुंडमळा संवेदनशील ठिकाण
कुंडमळाच्या पाण्यात बुडून यापूर्वी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दर वर्षी आठ ते दहा पर्यटक या पाण्यात जीव गमावतात. मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू झाली, की नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहायला लागतात. इंद्रायणी नदीला पूर आला, की कुंडमळ्यात पाण्याचा प्रवाह वेगाने वाहतो. अशा वेळी पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा पाण्यात तोल जाऊन अपघात होतो. कुंडमळा येथील प्रवाहात पर्यटकांनी उतरू नये, वाहत्या पाण्याच्या प्रवाहात जाण्याचा प्रयत्न करू नये, अशा आशयाचे माहितीफलक गेल्या आठवड्यात प्रशासनाने कुंडमळा येथे लावले आहेत.