अजित पवार यांच्या बंडानंतर आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार यांनी आज पहिलीच सभा घेतली ती छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवल्यात…. शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आणि पक्षाचे शेकडो कार्यकर्ते होते… येवल्यात जाऊन माझी चुकी झाली, माफी मागायला आलोय, पुढच्या वेळी येईन त्यावेळी योग्य निकाल सांगेन, असं म्हणत त्यांनी भुजबळांविरोधात दंड थोपटले.
सुप्रिया सुळे यांनी कोल्हेंना फ्रंटसीट दिली!
तत्पूर्वी, आज सकाळी शरद पवार मुंबईहून नाशिकच्या दिशेने रवाना झाल्यानंतर वाटेत ठाण्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केली. ठाण्यात पोहोचल्यावर जितेंद्र आव्हाडही पवारंबरोबर नाशिकला जायला निघाले. तेव्हा पवारांच्या गाडीत बसलेल्या सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पवारांशेजारी बसायला सांगितलं. तर अमोल कोल्हेंना फ्रंटसीट दिली. संपूर्ण प्रवासात कोल्हे आणि शरद पवार यांच्यात बातचीत सुरु होती. जितेंद्र आव्हाडही काही महत्त्वाच्या विषयांवर त्यांची मतं व्यक्त करत होते.
पत्रकार परिषद आणि सभेवेळी पवारांचं लक्ष अमोल कोल्हेंवरच!
शरद पवार यांनी नाशिकला पोहोचल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी अजितदादांनी वयावरुन केलेल्या टीकेसंबंधी प्रश्न विचारला असता, पवारांनी उत्तर देताना अमोल कोल्हे यांची मदत घेतली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ओळी अमोल कोल्हे यांना म्हणायला लावून त्या ओळी नंतर स्वत: पूर्ण केल्या.
दुसरीकडे येवल्यात सभा सुरु होण्यापूर्वी आपल्या खुर्चीशेजारी स्थानिक नेते बसलेले असताना त्यांना दुसऱ्या खुर्चीवर बसायला सांगून आपल्या शेजारी अमोल कोल्हे यांना बसायला जागा दिली. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे अमोल कोल्हे यांचं भाषणही पवारांनी खूप काळजीपूर्वक ऐकून भाषणादरम्यान त्यांना दादही दिली अन् कौतुकही केलं. एकंदरित ज्येष्ठ नेत्यांच्या बंडामुळे अमोल कोल्हे यांचं पक्षातलं महत्त्व वाढल्याचं चित्र आहे.