सन १९७५मध्ये बांधण्यात आलेल्या गोखले पुलाचा भाग ३ जुलै २०१८ला कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे हद्दीतील भाग धोकादायक असल्याच्या तक्रारीमुळे त्याचे काम हाती घेण्यात आले आणि ७ नोव्हेंबर २०२२पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुलाची पुर्नबांधणी मुंबई महापालिका करत आहे. पूल पुर्नबांधणीचे काम मे २०२३पर्यंत पूर्ण करून किमान एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र या कामाला पोलाद पुरवठ्यात उद्भवलेल्या अडचणीमुळे विलंब झाला.
सध्या, या परिसरात वाहन चालकांसाठी अंधेरी भुयारी मार्ग आणि विनायक गोरे उड्डाणपूल हे दोन पर्यायी मार्ग आहेत. अंधेरी भुयारी मार्ग हा सर्वात पसंतीच्या पर्यायी मार्गांपैकी एक असतानाच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्यामुळे संतप्त स्थानिकांनी पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग देण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि आमदार अमित साटम यांनी, गोखले उड्डाणपुलाच्या कामाचा गुरुवारी आढावा घेतला. रेल्वे हद्दीतील मार्गावर पुलाचा भाग येत असून या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सप्टेंबर अखेरीस पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर स्लॅब टाकण्यासह अन्य कामे केली जाणार आहेत. दिवाळीपर्यंत एक मार्गिका सुरू करणे आणि डिसेंबर २०२३ अखेरीस संपूर्ण पूल खुला करणे, यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे.