• Sat. Sep 21st, 2024

करोना कूपन्सचे पैसे कुणी लाटले? करोनायोद्धांपर्यंत ती रक्कम पोहोचलीच नसल्याची माहिती उघड

करोना कूपन्सचे पैसे कुणी लाटले? करोनायोद्धांपर्यंत ती रक्कम पोहोचलीच नसल्याची माहिती उघड

मुंबई : करोनाकाळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या करोनायोद्धांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी एका प्रसिद्ध कंपनीने प्रत्येकी पंधराशे रुपयांचे कूपन द्यायचे जाहीर केले होते. हे कूपन्स रुग्णालयांतील चार कर्मचारी, परिचारिका आणि डॉक्टरांना मिळणे अपेक्षित होते. मात्र हे कूपन्स करोनायोद्धांपर्यंत पोहोचले नसल्याचे उघडकीस आले आहे. या कूपन्सचे वितरण योग्यप्रकारे झाले नाही. याशिवाय यासंदर्भात ऑडिट न झाल्याने ही रक्कम नेमकी कुणाकडे वळती झाली, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे या कूपन्स घोटाळ्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

भाभा रुग्णालय, वांद्रे

प्रमुख वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडून या रुग्णालयाला ५७० कूपन देण्यात आले होते. मात्र रुग्णालयाने ५६५ कूपन मिळाल्याचे सांगितले. तसेच कूपन प्राप्त झाल्याची एकाही कर्मचाऱ्याची स्वाक्षरी नाही. रुग्णालयाने सादर केलेल्या यादीनुसार लसीकरण केंद्रासाठी कार्यरत असलेल्या २१ कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही या कूपनचा लाभ देण्यात आला. मात्र ज्यावेळी हे कूपन देण्यात आले त्यावेळी लसीकरणच सुरूही झाले नव्हते. कूपन्स वितरित झाल्यानंतर ‘मायबीएमसी कोअर टीम’ व्हॉट्सअॅप ग्रुपवर संबधित छायाचित्रे अपलोड करण्याचे निर्देश महापालिकेने दिले होते. त्या निर्देशांचेही पालन झाले नाही. तसेच ऑडिट करण्याचा नियमही पाळण्यात आलेला नाही.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली

या रुग्णालयाने ५०० कूपन्स वाटपाची अशीच यादी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीशिवाय दिली आहे. येथेही छायाचित्रे अपलोड करणे आणि ऑडिट करण्याच्या प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

व्ही. एन. देसाई रुग्णालय, सांताक्रूझ

या रुग्णालयाशी संबधित नसलेल्या एका डॉक्टराने सुरुवातीला १८६ कूपन घेतले. त्यावेळी ते मालाड येथील एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयाचे प्रमुख होते. त्यांचा व्ही. एन. देसाई रुग्णालयाशी कोणताही संबध नव्हता. तरीही त्यांनी हे कूपन्स वितरित करण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली. परंतु रुग्णालयाकडे केवळ १२६ कूपन्स वाटपाची नोंद आहे. उर्वरित ६० कूपन्सचे काय झाले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. रूग्णालयाने कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. परंतु येथेही छायाचित्रे काढली नाहीत, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अपलोड केले गेले नाहीत, ऑडिटही झाले नाही. ज्यांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये कूपन घेतले त्याच अधिकाऱ्यांनी मालाड येथील एस. के. पाटील रुग्णालयामध्ये कूपन वितरणाची जबाबदारी घेतली होती.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, बोरिवली

या रुग्णालयात १५० कूपन मिळाले येथे कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यात आली आहे. मात्र रुग्णालयाकडे केवळ १२१ कूपन वाटपाची नोंद असल्याने उर्वरित २९ कूपनच्या वितरणाबाबत प्रश्न अनुत्तरित आहेत. एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयाला २६७ कूपन देण्यात आले होते मात्र रुग्णालयाने २३० कूपन मिळाल्याचे सांगितले.

भाभा रुग्णालय, कुर्ला

या रुग्णालयाला ४७० कूपन देण्यात आल्याचा दावा प्रमुख वैद्यकीय अधीक्षक कार्यालय करत आहे. तर रुग्णालयाने केवळ ४६० कूपन्स मिळाल्याचे सांगितले आहे. येथील दहा कूपन्सचा मेळ लागत नसल्याचे दिसते.

मा रुग्णालय, चेंबूर

येथील १५० कर्मचाऱ्यांना कूपन्स दिल्याचे सांगितले मात्र एकाही कर्मचाऱ्याची स्वाक्षरी नोंद उपलब्ध नाही.
येरवड्यातील चौदा कर्मचाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनाच्या या निर्णयामागे आहे खास कारण
एकाच कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी कशी?

रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका तसेच विविध गटांतील कर्मचाऱ्यांना कूपनचे वितरण केल्यानंतर काही ठिकाणी एकाच कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी झालेल्या दिसून येतात. करोनाकाळामध्ये स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ही प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अपेक्षित होते. वैयक्तिक स्वार्थापोटी ही रक्कम स्वतःकडे वळवणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आरोग्यहक्क कार्यकर्ते विलास आशा मोहन यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed