• Mon. Nov 25th, 2024

    गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारशाचे जतन

    ByMH LIVE NEWS

    Jul 4, 2023
    गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारशाचे जतन

    साहित्य, संस्कृति, कला, शिक्षण याचबरोबर समृद्ध वारसा, इतिहास आणि परंपरा या कोणत्याही नागरी संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. गेल्या वर्षभरात राज्य शासन या सर्व बाबींना प्रोत्साहन देत असताना आपला गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा यासाठी  प्रयत्न करत आहे. गड किल्ले, पर्यटन आणि तीर्थस्थळांच्या नियोजनबद्ध विकासासाठी गत वर्षभरात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवरून हे दिसून येते.

    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्यात प्रथमच शिवराज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. हवेली तालुक्यात आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

    किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 45 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.  पुणे जिल्ह्यात सिंहगड किल्ल्याचा कल्याण दरवाजा आणि परिसर संवर्धनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळे प्रादेशिक पर्यटन योजनेतून 3 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापनेची शपथ रायरेश्वर मंदिरात घेतली. जिल्ह्यात स्वराज्य निर्मितीची गाथा सांगणारे गड-किल्ले आहेत. शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने आपला वैभवशाली आणि ऐतिहासिक वारशाचे संवर्धन होणार आहे आणि त्या माध्यमातून नव्या पिढीलादेखील प्रेरणा मिळेल.

    स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या हवेली तालुक्यातील तुळापूर आणि शिरुर तालुक्यातील समाधीस्थळ वढू (बु.) येथील स्मारकाच्या विकासासाठी 269 कोटी 24 लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील निविदा  प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    अष्टविनायक विकासाचा 43 कोटी 23 लाख रुपयांचा आराखडा मुख्य सचिवांच्या मंजुरीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक विकासासाठी 200 कोटींचा आराखडा तयार करण्यात येत आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगासह राज्यातील पाचही ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र आणि परिसर विकासाची कामे हाती घेण्यात येणार असून प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धनाची कामे हाती घेण्यात येणार ओहत.

    भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी 50 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. श्री क्षेत्र जेजुरी विकासासाठी 109 कोटी 57 लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील मुख्य मंदिराच्या जतन संवर्धनाच्या कामाची आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे संत तुकाराम महाराज यांच्या टाळकऱ्यांपैकी एक असलेले संत जगनाडे महाराज यांच्या समाधीस्थळ विकासासाठी 25 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

    पर्यटनालाही जिल्ह्यात मोठी चालना देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ५०० युवकांना जलपर्यटन, साहसी पर्यटन, कॅराव्हॅन पर्यटन आदी तसेच आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम करण्याचा संकल्प हा तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्यात दहा पर्यटनस्थळांवर ‘टेंट सिटी’ उभी करण्याचा निर्णय हा पर्यटन विकासाला गती देण्याबरोबरच तेथील रोजगार निर्मितीलाही चालना देणारा आहे.

    जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. त्यामुळे वन्यजीव प्रेमींची उत्सुकता शमविण्यासह वनपर्यटनाला चालना देण्यासाठी शिवनेरी, ता. जुन्नर येथे बिबट सफारी सुरू करण्यात येणार आहे.

    येथील शिक्षणाच्या समृद्ध परंपरा आणि वारशामुळे पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते. ही ओळख एवढ्यावरच मर्यादित राहिली नाही तर पुण्याला ‘पूर्वेचे ऑक्स्फर्ड’ म्हणून ओळखले जाते. येथील शासकीय, खासगी विद्यापीठे आणि शैक्षणिक, संशोधन संस्था या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या जातात.

    हाच वारसा अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने राज्य शासन अधिक प्रयत्नशील आहे. राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांना विशेष अनुदान देण्यासाठी 500 कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेतण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे तंत्रज्ञान विद्यापीठ यांचाही समावेश आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या दर्जेदार सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतील.

    गेल्या वर्षभरात शासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे आपला वारसा, परंपरा आणि इतिहासाची जपणूक  करण्यासोबत जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. आपले ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि जगासमोर ठळकपणे मांडण्यासाठी ही कामे उपयुक्त ठरतील यात शंका नाही.

    सचिन गाढवे,

    माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *