• Sun. Sep 22nd, 2024

मुंबईत जुलै महिन्यात होणार राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव

ByMH LIVE NEWS

Jun 28, 2023
मुंबईत जुलै महिन्यात होणार राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव

मुंबई,  दि. २८ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सव रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक १० ते १४ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ११ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.

या महोत्सवात रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे दि. १० ते १४ जुलै, २०२३ या कालावधीत हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम आलेले नाटक “इन द सेल ऑफ सर्व्हायवल”, हिंदी नाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “मोक्षदाह”, संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम नाटक “संगीत सुवर्णतुला”, संस्कृत नाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “मृगयाकलह:”, बालनाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “प्रायश्चित” आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “वाचवाल का” या सर्वोत्कृष्ट नाटकांचे सादरीकरण या होणार आहे.

मंगळवार दि. ११ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ६० व्या राज्यनाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल. या समारंभात मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

महोत्सवातील सर्व नाटके व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी नाट्य महोत्सवास व पारितोषिक वितरण समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed