• Mon. Nov 25th, 2024

    राज्यातील देवस्थानांवर महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची धर्मादाय आयुक्तांना सूचना

    ByMH LIVE NEWS

    Jun 27, 2023
    राज्यातील देवस्थानांवर महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची धर्मादाय आयुक्तांना सूचना

    मुंबई, ता. २७ : राज्यभरात असलेल्या विविध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. विशेषत: पंढरपूर, एकवीरा देवी, तुळजापूर, अष्टविनायक अशा देवस्थानांमध्ये भाविकांसाठी सुविधा होणे अत्यावश्यक आहे. महिला भाविकांसाठी पायाभूत सुविधा करण्याची आवश्यकता नेहमीच भासते. प्रवास, निवास, हिरकणी कक्ष, सुलभ शौचालये, महिलांसाठी अनुषंगिक सुविधा यावर विचार करण्याची अजूनही गरज आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानांच्या विश्वस्त समितीमध्ये योग्य प्रमाणात महिलांचा समावेश असावा. यासाठी नियमावलीमध्ये काय सुधारणा करता येतील याचा विचार व्हावा अशी सूचना आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी धर्मादाय आयुक्तांना केली.

    विधान भवनात जेजुरी देवस्थानच्या विषयावर विनंती अर्ज समितीच्या वतीने एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

    यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे जेजुरी देवस्थानबाबत एक अहवाल सादर करण्यात आला. मंदिराच्या आवारातील दुरुस्ती, डागडुजी कामे याबाबत पुरातत्व खात्याकडून माहिती सादर करण्यात आली. जेजुरी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून भाविकांकडून घेण्यात येणाऱ्या दर्शन पासच्या व्यवस्थेबाबत यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी विचारणा केली. गेल्या काही वर्षातील झालेल्या बैठकांच्या कागदपत्रांची तपासणी धर्मादाय आयुक्तांनी करावी. मंदिरात लावण्यात आलेल्या मेटल डिटेक्टरची नियमित देखभाल करून ते सुधारित स्वरूपात लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. जेजुरीमधील चिंचेची बाग परिसरात भाविकांकडून होत असलेल्या विविध विधींबाबत एक नियमावली करावी. मंदिर परिसरात भाविकांकडून उधळण्यात येणाऱ्या भंडारा (हळद) आयुर्वेदिक असली पाहिजे असा आग्रह धरतानाच त्यांनी आता वापरण्यात येणाऱ्या हळदीच्या नमुन्यांची चौकशी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

    मंदिर देवस्थानच्या विश्वस्त नेमणुकीबाबत निर्णय हा धोरणात्मक असल्याने संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी यामध्ये निर्णय घेणे उचित असल्याचे त्या म्हणाल्या. जेजुरी देवस्थानमध्ये नेमणूक केलेल्या विधिज्ञ यांची माहिती देण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. मंदिराचे कार्यकारी अधिकारी यांनी पुरातत्व खात्याच्या अहवालावर केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांच्याकडून येत्या ८ दिवसांत खुलासा मागवला आहे. जुलै महिन्यात डॉ. गोऱ्हे जेजुरीला भेट देणार असून याबाबत विभागीय आयुक्त स्तरावर आणखी आढावा बैठक घेणार आहेत.

    या बैठकीला विधान परिषद सदस्य उमा खापरे, विधी व न्याय विभागाचे सचिव नंदकिशोर मोरे, सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, महेंद्र महाजन, जेजुरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चारुदत्त इंगळे,  पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, प्रांत राजेंद्र सावंत, पुरातत्व खात्याचे विलास वाहने, तेजस्विनी आफळे, जेजुरी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *