• Mon. Nov 25th, 2024

    सलोखा वाढतोय! पाच महिन्यात १४९ दस्तांची नोंद

    ByMH LIVE NEWS

    Jun 20, 2023
    सलोखा वाढतोय! पाच महिन्यात १४९ दस्तांची नोंद

    मुंबई, दि . २० :  सलोखा योजनेंतर्गत राज्यभर दस्त नोंदणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पाच महिन्यात १४९ दस्तांची नोंद झाल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. आगामी काळात गावपातळीवर जनजागृतीच्या विविध माध्यमांद्वारे सलोखा योजना अधिक गतिमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

    सलोखा योजनेंतर्गत राज्यभरात सर्वात जास्त ७६ एवढी दस्त नोंदणी अमरावती विभागात झाली असून यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. तर पुणे आणि ठाणे विभागात प्रत्येकी १७ एवढ्या दस्त नोंद झाली आहे. त्या खालोखाल नागपूर विभागात १२, नाशिक विभागात १०, औरंगाबाद विभागात ९, लातूर विभागात ८ एवढ्या दस्त नोंद झालेली आहे. राज्यात एकूण १४९ दस्त नोंद झाली असून योजनेतील सवलतीनुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क असे अनुक्रमे १ लाख ४९ हजार २०० एवढे प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    शेतीमधील वहिवाटीसंदर्भात गावपातळीवर पिढ्यानपिढ्या वादाचे विषय सामंजस्याने मिटवितानाच गावात सलोखा राखण्याच्या दृष्टीने महसूल विभागाच्या माध्यमातून महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सलोखा योजनेसारखा व्यापक जनहिताचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला. शेतजमिनीचा ताबा एका शेतकऱ्याकडे व अभिलेख दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावे असलेल्या प्रकरणी सहमतीने अदलाबदल करुन अभिलेख दुरुस्त करण्याच्या उद्देशाने शासन निर्णयान्वये सलोखा योजना प्रत्यक्षात दि. ३ जानेवारी २०२३ पासून अंमलात आणली. या योजनेअंतर्गत नोंद होणाऱ्या अदलाबदल दस्तावर मुद्रांक शुल्कासाठी १ हजार रुपये आणि नोंदणी शुल्क १ हजार रुपये अशी नाममात्र रक्कम ठेवण्यात आली होती.

    महसूल विभागाकडे असंख्य तक्रारी दाखल असून सद्यपरिस्थिती बदलण्यासाठी, शेतकरी बांधव वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत राहतात म्हणून जनहित डोळ्यासमोर ठेवून महसूल विभागाने सलोखा योजना सुरु केली. या योजनेमुळे समाजात सलोखा निर्माण होण्यास, एकमेकांतील सौख्य, शांतता आणि सौहार्द वाढण्यास मदतच होणार आहे. गाव तंटामुक्ती समितीच्या सहकार्याने स्थानिक प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांना गावपातळीवर जनजागृतीच्या विविध माध्यमांद्वारे सलोखा योजना अधिक गतिमान करण्याबाबतचे निर्देश दिले असल्याचे महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

    ००००

    वर्षा आंधळे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed