प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन प्रा. मनिषा कायंदे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. प्रा.मनिषा कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
कोण आहेत मनिषा कायंदे?
मनिषा कायंदे शिवसेनेत येण्यापूर्वी भाजपमध्ये कार्यरत होत्या. १९९७ ला त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली, पण शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला होता. भाजपमध्ये बरीच वर्ष काम केल्यानंतर त्यांनी २००९ ला भाजपकडून त्या सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. मनिषा कायंदे यांनी त्यानंतर २०१२ साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. २०१८ ला त्यांना उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेचे तिकीट दिले.
मनिषा कायंदे यांच्यासाठी विधानपरिषदेवर जाणं हा त्यांच्या राजकीय प्रवासातील मोठा टर्निंग पॉइंट होता. तेव्हापासून आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख झाली होती. ११ वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं.
महिलांवरील अत्याचार, महिलांना आरक्षण, महिलांच्या रेल्वे प्रवासाच्या समस्या आदी मुद्द्यांवर त्यांची सातत्याने आंदोलने केली होती. आता त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळं शिंदे गटाचं विधानपरिषदेतील संख्याबळ दोनवर पोहोचलं आहे.