• Mon. Nov 25th, 2024
    राक्षसांनी बांधलेलं मंदिर अन् भुतांची जत्रा; नगरच्या गावातील अनोखी प्रथा माहितेय का?

    अहमदनगर: अहमदनगर शहरापासून २० किलोमीटरवर असलेले आगडगाव आमटी भाकरीच्या महाप्रसादसाठी प्रसिद्ध आहे. ज्या काळ भैरवनाथ देवस्थानतर्फे हा उपक्रम चालतो, त्याबद्दल अनेक आख्यायिकाही सांगितल्या जातात. येथील मंदिर पूर्वीच्या काळी राक्षसांनी बांधले आहे असे मानतात. तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंदिराच्या परिसरात भुतांची यात्रा भरते अशी आख्यायिकाही सांगितली जाते. अंधश्रद्धेचे स्तोम न माजवता गावकरीही यामागील कार्यकारणभाव शोधत आहेत.आगडगावमध्ये काळ भैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. छोटेच, पण टुमदार मंदिर तेथे आहे. त्यावर शिलालेख नाही. मात्र मोठमोठे दगड आणि शिळांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्तींनीच बांधले असावे, असा अंदाज बांधला जातो. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. त्यांच्या नावांवरून याला दुजोरा मिळतो.

    आणखी एक दुजोरा देणारी गोष्ट म्हणजे मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. या मंदिराचे बांधकाम केव्हा झाले हे निश्चित सांगता येत नाही. देवस्थानजवळ निस्पृह बाबांची गादी आहे. बाबांचे निधन झाल्यानंतर त्याच परिसरात त्यांची समाधी बांधली जाते. अशा २४ समाधी तेथे आहेत. यावरून २४ पिढ्यांपेक्षा जुना इतिहास याला असल्याचे मानले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत. मंदिराच्या शेजारी एक जुना कडुलिंब आहे. त्याची पाने मात्र गोड लागतात. त्याला बहर येतो, पण लिंबोळ्या लागत नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांत त्याचे एकही दुसरी रोपटे तयार झालेले नाही. असे हे अजब ठिकाण.

    चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथे जत्रा भरते. पूर्वी तेथे पशुहत्या होत होती. अलीकडे काही वर्षांत गावकऱ्यांच्या, विशेषतः तरुणांच्या पुढाकारातून ही प्रथा बंद झाली. चोहोबांजूनी डोंगर आणि मधल्या दरीत मंदिराचा परिसर आहे. तेथेच मोठमोठे जुने वृक्ष आहेत. तेथे ही जत्रा भरते. रविवारी माणसांची जत्रा झाल्यावर सोमवारी भुतांची जत्रा असते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी त्या परिसरात कोणी जाऊ नये असा संकेत असून गावकरी तो पाळतात.

    भुतांची ही जत्रा नेमकी केव्हापासून सुरू झाली, याचीही नेमकी माहिती उपलब्ध नाही. गावातील जुन्या पिढीतील लोक सांगतात की, खूप वर्षांपूर्वी गावातील गोपीनाथ कर्पे हे यात्रेच्या दिवशी आपली तेलाची घागर मंदिरातील दीपमाळेजवळ विसरले. त्यांना दुसऱ्या दिवशी रात्री त्याची आठवण झाली. त्यामुळे ते घागर आणण्यासाठी मंदिराजवळ गेले. तेव्हा त्यांना तेथे विचित्र आकृत्या नाचताना दिसल्या. त्यांनी ही माहिती त्यावेळी गावकऱ्यांना दिली होती. त्यांचे पणतू कोंडिबा कर्पे या माहितीला दुजोरा देतात. अर्थात या सांगीव कथा आहेत.

    पूर्वी येथे पशुहत्या होत होती. जेवणावळीही तेथेच उठत. त्यामुळे उष्टी, खरकटी तेथेच टाकली जात. दुसऱ्या दिवशी जर या भागात शांतता ठेवली, तर कुत्री आणि जंगली पशू येऊन टाकलेले अन्न खातील, नैसर्गिकरीत्या साफसफाईचे काम होई. मात्र, असे कोणी ऐकणार नाही, त्यामुळे भुतांच्या जत्रेचे कारण पुढे आले असावे, असे मानणारा एक मतप्रवाह आहे. काळभैरव हा शंकराचा स्मशानातील अवतार. शंकर भस्मधारी. त्यांच्याशी भुताचा संबंध असल्याचा उल्लेख अनेक ग्रंथात आढळतो. त्यामुळे आगडगावमध्ये या दैवताशी भुतांचा संबंध जोडून ही अख्यायिका सांगितली जात असावी, असेही मानले जाते.

    आख्यायिका काहीही असली, तरी अलीकडे एक उत्तम तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणूनही हे प्रसिद्धीला आले आहे. तेथे दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी होते. येणाऱ्या प्रत्येकाला आमटी-भाकरीचा प्रसाद दिला जातो. भाविकांच्या देणगीतून तयार केली जाणारी मिश्र डाळींची खास आमटी आणि बाजरी-ज्वारीच्या भाकरी यांचे पोटभर जेवण येणाऱ्या सर्वांना दिले जाते. अन्नदानासाठी देणगी देणाऱ्यांनाही आपला नंबर येण्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते, एवढा प्रतिसाद याला मिळतो.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed