• Mon. Sep 23rd, 2024

जी-२० परिषदेत उद्यापासून पुण्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयावर बैठक; ‘रन फॉर एज्युकेशन’च्या माध्यमातून शिक्षणाबाबत जागृती करणार

ByMH LIVE NEWS

Jun 16, 2023
जी-२० परिषदेत उद्यापासून पुण्यात पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विषयावर बैठक; ‘रन फॉर एज्युकेशन’च्या माध्यमातून शिक्षणाबाबत जागृती करणार

मुंबई, ता. 16 : भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाची बैठक शनिवार दि. 17 जून पासून पुणे येथे होत आहे. या बैठकीत ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ (फाऊंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी) (एफएलएन) या विषयावर चर्चा होणार असून शिक्षणाबाबत जागृतीसाठी 20 जून रोजी राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक स्तरावर ‘रन फॉर एज्युकेशन’चे आयोजन केले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, जी-20 परिषदेअंतर्गत चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य यजमानपदाची भूमिका पार पाडीत आहे. ही बैठक दिनांक 17 ते 22 जून, 2023 दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होत आहे. बैठकीमध्ये विविध प्रकारच्या आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा समावेश करून ‘ब्लेंडेड लर्निंग’ ही संकल्पना राबवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामध्ये विशेषत: वय वर्ष 3 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानामध्ये वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे. विविध राज्यांमध्ये या संदर्भात राबविण्यात येत असलेल्या उत्तम कार्यक्रमांची माहितीही सादर करण्यात येणार आहे.

मुलांच्या शिक्षणाची सुरूवात मातृभाषेतून झाली तर मुलांना ते ज्ञान आत्मसात करणे सोपे जाते व त्यांना शिक्षणाप्रती आत्मविश्वास वाढतो हे जागतिक स्तरावरील अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. ही बाब विचारात घेऊन मुलांच्या पायाभूत शिक्षणाचा पाया भक्कम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी राज्यात शाळापूर्व तयारी अभियान (पहिले पाऊल) राबविले जात आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्यांच्या पालकांना समाविष्ट करून घेतल्यामुळे पालक समुदाय विशेषत: माता-पालक मुलांच्या शिक्षणात अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. पहिले पाऊल उपक्रमाचे भारत सरकार व जागतिक बँकेने विशेष कौतुक केले असून इतर राज्यांनासुद्धा अशाच प्रकारे अभियान राबविण्याचे सुचविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

दिनांक 20 जून, 2023 रोजी राज्यातील सर्व आठ शैक्षणिक विभागीय स्तरांवर ‘रन फॉर एज्युकेशन’ रॅली आयोजित करण्यात येत आहे. या रॅलीमध्ये प्रत्येक विभाग स्तरावर किमान 500 विद्यार्थी सहभागी होतील. त्यांना टी शर्ट आणि टोपी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक सुदृढता निर्माण व्हावी, खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, आनंददायी शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी तसेच नवीन शैक्षणिक धोरण जनसामान्यांपर्यंत पोहचावे यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले.

 शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना कौशल्य आधारित शिक्षण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश तसेच बूट आणि सॉक्स देखील देण्यात येत आहेत. टीसी अभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा शालेय प्रवेश सुलभ करण्यात येत आहे. याचबरोबर शाळांमधून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed