• Sun. Sep 22nd, 2024

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांचे उपमुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण

ByMH LIVE NEWS

Jun 16, 2023
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांचे उपमुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण

उस्मानाबाद, दि. 16 (जिमाका) : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदीर आणि शहर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबर भाविकांचे तुळजाभवानीचे दर्शन सुलभ आणि जलदगतीने व्हावे यासाठी प्रस्तावित तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांनी तुळजाभवानी चे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर सभागृहात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांसमोर तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाच्या  पहिल्या टप्प्यातील १ हजार १७४ कोटी रुपयांच्या प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस आमदार सर्वश्री  प्रवीण दरेकर, राणा जगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मंदिराच्या सध्याच्या वास्तुचे जतन आणि संवर्धन, सेवा सुविधांमध्ये दर्जात्मक वाढ, मंदिर परिसर आणि शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सध्याच्या सोयी सुविधांचा विकास आणि विस्तार, गर्दीचे व्यवस्थापन या मुद्दांचा प्रामुख्याने प्रस्तावित आराखड्यात विचार करण्यात आला आहे.

मंदिर गाभारा आणि परिसरातील काही भागाच्या नुतनीकरण आणि दुरूस्तीच्या कामांबरोबरच वाहनतळ व्यवस्था, ऑडीटोरियम, सीसीटीव्ही, नागरिक संबोधन कक्ष, वातानुकूलित सभागृहे ज्यातून दर्शन रांग पुढे जाईल व टप्प्या टप्पयाने भाविकांना मंदिरात प्रवेश मिळेल अशी व्यवस्था यासारखी कामे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत.    तुळजापूर शहरालगत असलेल्या रामदरा परिसरात उद्यान साकारले जाणार असून येथे  कुलस्वामिनी तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाचा भव्य पुतळा उभारण्याचे नियोजन आहे.  शहराच्या प्रत्येक प्रमुख मार्गावर दगडी कमानी उभारण्याचेही आराखड्यात प्रस्तावित आहे. मंदिर, तुळजापूर शहर परिसरातील संपूर्ण भागाचा विकास करणे, धार्मिक पर्यटनाला चालना देऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधीचा विकास करण्याच्यादृष्टीने आराखड्यात कामे प्रस्ताविक करण्यात आली असल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सादरीकरण करतांना सांगितले.

*****

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed