• Mon. Nov 25th, 2024

    मल्लखांब आणि दांडपट्ट्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी परदेशी पाहुणे रोमांचित

    ByMH LIVE NEWS

    Jun 13, 2023
    मल्लखांब आणि दांडपट्ट्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी परदेशी पाहुणे रोमांचित

    पुणे, दि.१३ : ढोल, लेझीम, तुतारी, मृदंग आणि टाळाचा गजर….. फडकणारे भगवे ध्वज…..श्वास रोखायला लावणारे मल्लखांब आणि मर्दानी दांडपट्ट्यांची प्रात्यक्षिके….कळसूत्री बाहुल्या…. विठुनामाचा गजर….. डोक्यावर फेटा बांधलेले आणि हातात बांगड्या घातलेले प्रफुल्लित चेहरे….गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण….अशा उत्साहाच्या वातावरणात परदेशी पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या साथीने आनंदसोहळा अनुभवला.

    ‘जी-२०’ डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-२० प्रतिनिधींसाठीं महाराष्ट्र शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मल्लखांब आणि दांडपट्ट्याच्या अस्सल मराठमोळ्या खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून परदेशी पाहुणे रोमांचित झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात सादर झालेल्या शास्त्रीय नृत्यांनीही पाहुण्यांना मोहित केले.

    प्रारंभी राज्य शासनाच्यावतीने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी परदेशी प्रतिनिधींचे स्वागत केले. कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल आदी उपस्थित होते.

    निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी क्रीडा हायस्कूलच्या मुलांनी पेटत्या मशाली आणि तलवारी घेऊन सादर केलेल्या मल्लखांब प्रात्यक्षिकांनी पाहुण्यांची मने जिंकली. मल्लखांबावर साकारलेल्या मानवी मनोऱ्यांनाही त्यांनी भरभरून दाद दिली. बाटली मल्लखांब प्रात्यक्षिकातील जोखीम, लवचिकता, एकाग्रता आणि संतुलनाचे प्रदर्शनही पाहुण्यांची दाद मिळवून गेले.

    कोल्हापूरच्या शिवशंभू मर्दानी आखाड्याच्या मुलामुलींनी सादर केलेले दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिकदेखील तेवढेच चित्तथरारक होते. या प्रत्यक्षिकांना आलेल्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त दाद दिली. युद्धाच्यावेळी वापरायचा पाश, काठी, भाल्याचे मर्दानी खेळही यावेळी सादर करण्यात आले.

    मोर आणि कोंबड्याचे आवरण घालून नृत्य करणारे कलाकारांनी ढोल आणि लेझीमच्या तालावर नृत्य करीत परदेशी प्रतिनिधींचे स्वागत केले. कळसूत्री बाहुल्यांच्या नृत्याचाही प्रतिनिधींनी आनंद घेतला. महाराष्ट्राचा रंगीत फेटा घातल्यावर मोबाईलमध्ये स्वतःची छबी टिपण्याचा मोह त्यांना आवरला नाही. आषाढी वारीच्या निमित्ताने टाळ-मृदंग, एकतारीच्या गजरातही पाहुणे तल्लीन झाले.

    महिला प्रतिनिधींनी हातात बांगड्या भरून डोक्यावर फेटा घातल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. ही उत्साहपूर्ण वातावरणाची आठवण मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी एकाचवेळी अनेक हात पुढे आले होते.

    कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठ परिसरात जणू कलासंपन्न महाराष्ट्र प्रकटला होता. सिंहासनावर विराजमान असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आणि विठोबाची मोठी मूर्ती साकारण्यात आली होती.

    लेझीम आणि लावणीच्या तालावर पाहुण्यांनी धरला ठेका

    मराठमोळ्या अभंगांनी आणि गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. विठोबा-रखुमाईच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले. भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्यातील पदन्यास आणि विविध मुद्रांनी पाहुण्यांना अक्षरशः मोहित केले. डोक्यावर समई घेऊन नृत्यात मनोरे रचणाऱ्या महिला कलाकारांना टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. डोंबारी नृत्यातील चित्तथरारक मनोऱ्यांनीही पाहुण्यांना रोमांचित केले तर लावणीचा मनसोक्त आनंदही त्यांनी घेतला. शिवराज्याभिषेक सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

    कार्यक्रमानंतर लावणीच्या सादरीकरणाची पुन्हा एकदा मागणी करत पाहुण्यांनी आधी लावणी आणि नंतर लेझीमच्या तालावर ठेका धरला. पुणे जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सर्व प्रतिनिधींनी भरभरून कौतुक केले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *