याबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले की, जोशीविहीरहून (ता. वाई ) सारोळा (ता. भोर) येथे आपल्या लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून (क्रमांक एमएच ११ सीवाय ७८०४) निघालेले गुरव दांपत्यांना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने (क्रमांक एमएच १४ जीयू ३१३०) दुचाकीस उडवले. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या सिंधुबाई गुरव यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या, तर पती जनार्दन गुरव हे सुखरूप आहेत. ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते.
यावेळी घटनास्थळी खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे व पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे यांच्यासह वाहतूक पोलीस गणेश सणस, जाधव, पोळ, महागंडे, धायगुडे व अमित चव्हाण यांनी भेट दिली. पोलिसांनी महामार्गावर अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस स्टेशनला झाली आहे. प्रभाकर गणपत किनगे (रा. मालेगाव कल्याणी, ता. निलंगा, जि. लातूर ) या मालट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खंबाटकी घाटात एस वळणावर काल शनिवारीही असाच अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला होता. सलग दुसऱ्या दिवशी हा अपघात झाला. ठप्प झालेल्या महामार्गाच्या कामामुळे या ठिकाणी वाहनांची गर्दी होते, तसेच रस्ता फारच अरुंद आहे. यामुळे वाहनांना बाजूला सरकायला साईडपट्टीही नाही . परिणामी ट्रक -कंटेनर दुचाकी वाहनास जुमानत नाही . यामुळे येथे वांरवार अपघात होत असतो, तरी रस्त्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.