• Mon. Nov 25th, 2024

    गोड्या पाण्याच्या प्रकल्पाचा खारपाणपट्ट्याला लाभ होणार  – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    ByMH LIVE NEWS

    Jun 11, 2023
    गोड्या पाण्याच्या प्रकल्पाचा खारपाणपट्ट्याला लाभ होणार  – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    अमरावती, दि. ११ : बोराळा येथील गोड पाण्याच्या पायलट प्रोजेक्टमुळे खारपाणपट्ट्यातील  गावांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊन लोकांना रोज गोड पाणी प्यायला मिळेल. गोड्या पाण्यामुळे येथील संत्री, फळबागांचे उत्पादन वाढेल. येथील पाण्याचा खारटपणा प्रत्येक लीटरला २५०० मिलीग्रॅम असा आहे. आणि हे टीडीएस ५०० च्या आत आल्यावर हा प्रयोग यशस्वी ठरेल. प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर या तीन जिल्ह्यात असे ९४० प्रकल्प याच धर्तीवर निर्माण केल्यास हा प्रदेश खारपाणमुक्त प्रदेश होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बोराळा येथे व्यक्त केला.

    केद्रींय मंत्री श्री. गडकरी यांनी दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार बळवंतराव वानखडे, किरण पातुरकर ,निवेदिता चौधरी ,बोराळा सरपंच वनिता वसु तसेच विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, दर्यापूर कृषी अधिकारी भाग्यश्री अडपावार तसेच प्रकल्पाचे मार्गदर्शक माजी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यावेळी उपस्थित होते.

    केद्रींय मंत्री श्री. गडकरी यांनी बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. ते म्हणाले की, पश्चिम विदर्भात अमरावती, अकोला  व बुलडाणा या जिल्ह्यात पुर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे. या गाळाच्या प्रदेशामध्ये जवळपास ३ हजार चौ. कि. मी. क्षेत्रात खाऱ्या पाण्याची समस्या आहे. येथील पाणी खारट आहे. ते पिण्यासाठी तसेच शेतीसाठीही उपयुक्त नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीके घेण्यास अडचणी येतात. प्राचीन काळी या भागात समुद्र होता. त्यामुळे येथील भूगर्भातील पाणी खारट आहे. यावर उपाययोजना म्हणून माजी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भूविज्ञानशास्त्राचा प्रयोग राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्यशासनाने दीड कोटी रुपये प्रायोगिक तत्त्वावर दिले आहेत. प्रकल्पासाठी जवळच बंधारे बांधून त्यात पावसाचे गोडे पाणी साठविणार आहे. गावकरी व शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी गोडपाणी जमिनीपासून केवळ ५० फुटाच्या खोलीवर उपलब्ध करुन देण्याबाबतचा हा प्रायोगिक प्रकल्प आहे.

    या प्रकल्पामुळे बोराळासह आराळा, अजितपूर आणि जसापूर या चार गावातील शेतीला गोड पाणी मिळेल. येथील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजना राबविल्यास अधिक भूभागावरील शेतीला गोड पाणी उपलब्ध होऊन बारमाही पाणी लाभेल. तसेच येथील उपलब्ध खाऱ्या पाण्याचा उपयोग करून झिंग्यांचे उत्पादन घेता येईल.

    यासाठी शेततळे तयार करून त्यात खारे पाणी टाकल्यास त्यास झिंग्याची पैदास करता येईल. या पूरक व्यवसायामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होईल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोड पाण्याचा असाच प्रयोग राजस्थान येथील गंगानगरला करण्यात आला आहे. तेथील स्थानिकांना आता खाऱ्या पाण्याचे वरदान लाभले आहे. तेथील नागरिक गोड्या तसेच खाऱ्या पाण्यामध्ये झिंग्यांची शेती करीत आहेत. त्याला परदेशामध्ये मोठी मागणी आहे. बोराळा प्रकल्पामुळे पिण्यायोग्य पाणी मिळेलच शिवाय खार पाण्यातून झिंग्यांची शेतीही करता येणार आहे. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून गोड्या पाण्यातील झिंगे आणि खाऱ्या पाण्यातील झिंगे असे उत्पादन घेता येईल. या प्रकल्पासाठी स्थानिक प्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

    खाऱ्यापाण पट्ट्यात ८९४ गावांचा समावेश

    या खाऱ्या पाण्याच्या पट्ट्यामध्ये एकूण ८९४ गावांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात ३५५गावे, अकोला जिल्ह्यात ३७३ गावे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये १६६ गावे असे एकूण ८९४ गावांचा हा प्रश्न आहे. यापैकी दर्यापूर तालुक्यातील १४६ गावे समाविष्ट आहेत. या भागात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी देण्याचे फार मोठे आव्हान होते. यासाठी प्रायोगिक प्रकल्प म्हणून दर्यापूर तालुक्यातील बोराळा या गावाची निवड करण्यात आली. नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला मंजूरी दिली. या भागात जमिनीपासून ५ फुटावर काळी माती आहे. त्यानंतर २५ ते ३० फुटावर पिवळी माती लागते. त्यानंतर १५ ते २० फुटाचा वाळूचा थर आहे. त्यानंतर पुन्हा पिवळी माती लागते. ही पिवळी माती पाणी घेत नाही तसेच पाणी देतही नाही. यासाठी या प्रकल्पाच्या आजूबाजूला ५०० ते १००० फुटावर ६ कुपनलिका घेण्यात आल्या. त्यांची खोली ६० फुट आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *