• Sun. Sep 22nd, 2024

टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ByMH LIVE NEWS

Jun 10, 2023
टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे, दि. १० : ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ्यात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक पादुकांचे पूजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे,  बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आदी उपस्थित होते.

पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.

महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed