• Mon. Nov 25th, 2024
    माणसातला देव ओळखण्याचं काम रुपाली चाकणकरांनी केलं :  चंद्रकांत पाटील

    पुणे : संतांची भूमी असलेल्या, वारीची परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या साधू-संतांनी देव माणसात ओळखावा, त्याची सेवा करावी असं सांगून ठेवलंय. माणसातला देव ओळखत आरोग्य वारीच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा उपक्रम महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हाती घेतलाय असं सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाचे कौतुक केले.

    आषाढी वारी कालावधीमध्ये वारकरी महिलांना सुरक्षा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून आयोजित आरोग्य वारी उपक्रमाचा शुभारंभ पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. भवानी पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सदस्या संगीता चव्हाण, ॲड गौरी छाब्रिया, आमदार रवींद्र धंगेकर, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र विनवडे, स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या सह पुणे महानगरपालिका आणि महिला आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. भवानी पेठेत महिला वारकऱ्यांसाठी उभारलेल्या सुविधा केंद्राचे उद्घाटन ही यावेळी मान्यवरांनी केले.

    यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वर्षानुवर्षे वारी होते आहे. दरवर्षी नव्या अडचणी, अडथळे समोर आले की त्यावर मार्ग शोधणारे ही उभे राहतात. तसचं लाखो महिला वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मार्ग शोधण्याचे आणि त्यासाठी पुढाकार घेण्याचे काम रूपाली चाकणकर यांनी केले आहे. मासिक पाळी बाबत महिलांच्या मनात संकोच असतो, समाजातही त्याबाबत आरोग्याच्या दृष्टीने बोलले जात नाही. वारी काळातही महिलांना एकदा तरी सॅनिटरी पॅडची गरज पडते. त्यामुळे ते मोफत उपलब्ध करून देणे आणि ते पर्यावरणपूरक नष्ट करण्याची व्यवस्था करणे ही आवश्यक बाब आहे. महिलांचा वारी प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी हाती घेण्यात आलेला आरोग्य वारी हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. समाजाची गरज ओळखता आली पाहिजे. आणि आपण ती ओळखून आरोग्य वारीच्या माध्यमातून महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत आहात, पुण्यांच काम करत आहात अस सांगत महिला आयोगाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

    आरोग्य वारीचे आयोजन करण्यामागील आयोगाची भूमिका सांगताना अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, पांडुरंगाच्या ओढीने अनेक दिवस महिला चालत असतात. त्यांना आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध करून देत त्यांची वारी सुखकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणे, सातारा, सोलापूर प्रशासनाच्या सहकार्याने हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड वेंडिंग बर्निंग मशीन, डॉक्टरांचे फिरते पथक, १०९१ हेल्पलाइन बाबत माहिती देणे, निर्भया पथकाची गस्त, पुरेसे फिरते शौचालये, निवारा गृह अशा सुविधा देण्यात येत आहेत. पुण्यात ५००० सॅनिटरी पॅडचे वाटप, साताऱ्यात आंतर रुग्ण कक्ष या सुविधा सह सोलापुरात महिलांच्या हस्ते पंधरा हजार वृक्ष लागवड करत हरित वारी उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. महिला वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच आमच्यासाठी पांडुरंगाचे दर्शन आहे अशा शब्दात चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुणे जिल्हा प्रशासनाचे त्यांच्या नियोजनाबाबत कौतुक करत राज्य महिला आयोगाला आरोग्यवारी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *