गृहमंत्री फडणवीस म्हणतात की अचानक औरंग्याच्या अवलादी कशा निर्माण झाल्या ? त्या तुम्हीच निर्माण केल्या. दंगलखोरांवर आतापर्यंत कारवाई का केली नाही? कोल्हापूरच्या दंगलीतील ९० टक्के लोक कोल्हापूरच्या बाहेरचे होते. त्यांना कुणी निरोप दिला, असा सवाल राऊत यांनी केला.
शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेचा ३८ वा वर्धापन दिन गुरुवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संत एकनाथ रंगमंदिर येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा झाला. या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंग राजपूत, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, शहरप्रमुख किशनचंद तनवाणी, अशोक पटवर्धन, अनिता घोडेले, कला ओझा, देवयानी डोणगावकर, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, बंडू ओक यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘शिवसेनेकडे अधिकृत चिन्ह आणि पक्षाचे नाव नसताना आपण लढत आहोत. महाराष्ट्रात जिकडे जाऊ तिकडे तुफान निर्माण होत आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी पेरले ते विष नव्हते, तर अमृताच्या बिया होत्या. जे पक्ष सोडून गेले ते निवडून येणार नाहीत हे आपले ध्येय असावे. शंभर गद्दार निघून जातात आणि एक उदयसिंग राजपूत राहतो, अशाच लोकांमुळे शिवसेना टिकली आहे. खोकेवाले म्हणतात शिवसेना आमची आहे. पण, आधी तुमचा बाप कोण ते तरी ठरवा. मिंधे गट व्यासपीठावर कधीच बाळासाहेबांचे नाव घेत नाही. सारखे मोदी मोदी करतात. त्यामुळे त्यांनी त्यांचे पालक, बाप ठरवावा. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार डिसमिस केले आहे. न्यायालय फाशीची शिक्षा सुनावत असते, पण फाशी देण्यासाठी जल्लाद लागतो. ते काम विधानसभा अध्यक्षाकडे सोपवले आहे. कायद्याचे पालन करुन कार्यवाही केल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू’, असे राऊत म्हणाले.
‘देवेंद्र फडणवीस यांनी शहरात जलआक्रोश मोर्चा काढून महाविकास आघाडीवर टीका केली होती. राज्यात यांची सत्ता येऊन अकरा महिने झाले तरी जलवाहिनी पूर्ण झाली नाही. फक्त तीन किलोमीटर काम झाले. राज्यात फक्त घोषणा सुरू असून शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत’, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. ‘भुमरे यांनी सगळी पदे घरातच वाटून घेतली आहेत. दारुच्या बारा दुकाना उघडल्या आहेत. इथला आधीचा जिल्हाधिकारी आणि अब्दुल सत्तार यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्याच जिल्हाधिकाऱ्याला कृषी आयुक्त करुन सत्तार यांनी भ्रष्टाचार सुरू केला, अशी टीका खैरे यांनी केली.