‘ढाब्यांवर मद्यप्राशन करणे चुकीचे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाया सुरू आहेत. गेल्या वर्षभरात ३९ गुन्हे दाखल नोंदविण्यात आले असून १५३ लोकांना अटक करण्यात आली’, असे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी सांगितले.
तक्रारी वाढल्या…
परमिट रूमची परवानगी नसलेल्या ढाब्यांवर बसून मद्यपान करणे हा गुन्हा आहे. याचबरोबर मद्यपींना साथ देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येते. ही मोहीम पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. नागपूर जिल्हा परमिट रूम असोसिएशननेही ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथून अवैध मद्य आणून इथे विकले जात असल्याचेही या तक्रारीत नमूद होते. कोणताही परवाना नसताना मद्य आणि खाद्यपदार्थांची विक्री होणे हे धोकादायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
कायदा काय सांगतो?
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कलम ६८अंतर्गत ढाब्यावर मद्यपींसाठी दारू पिण्याची व्यवस्था केली जात असेल तर ढाबेमालकावर २५ हजार ते ५० हजारांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. यासह तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. कायद्याच्या कलम ‘८४ ख’अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे आणि त्याला साथ देणाऱ्याला ५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
आँखो देखी…
-त्रिमूर्तीनगरमधील एका ढाब्यावर ‘इथे मद्यप्राशन करण्यास प्रतिबंध आहे’, अशी स्पष्ट सूचना लिहिण्यात आली आहे. मात्र, ‘मटा’ने या ढाब्याचा कचरा तपासला असता त्यात मद्याच्या बाटल्या आढळल्या.
-बजाजनगरमधील एका ढाब्याबाहेरही अशाच मद्याच्या बाटल्या पडल्या होत्या. येथील एका कर्मचाऱ्याशी संवाद साधल्यानंतर त्याने कुठलीही कारवाई होणार नसल्याची खात्री देत मद्य उपलब्ध करून देण्याची हमी दिली.
-खामला येथील एका ढाब्यावर ‘मटा’ची चमू पोहोचली. तेथील कर्मचाऱ्यानेही ‘मद्य पुरवू’, असे सांगितले. ‘बाहर से ढाबा बंद हैं ऐसा लगेगा, आप चिंता मत करो, आप को शराब जितनी चाहिये उतनी मिलेगी’, असे तेथे सांगण्यात आले.
-सुभाषनगर परिसरातील एका ढाब्याला भेट दिली असता ‘दारू तुम्हाला आणावी लागेल, आम्ही जागा उपलब्ध करून देऊ, एकच्या आत पार्टी आटोपावी लागेल’, असे सुरुवातीला सांगितले गेले. मात्र, नंतर मद्य पुरविण्याची तयारी दर्शविली.
-अमरावती महामार्गावरील काही ढाब्यांवर भेट दिली असता तिथे मद्यपार्ट्या सुरू असल्याचे आढळून आले.