• Sun. Mar 15th, 2026

    संभाजीनगर नाही, औरंगाबादच म्हणणार…शरद पवार खरंच असं म्हणाले? राष्ट्रवादीने मांडली बाजू

    संभाजीनगर नाही, औरंगाबादच म्हणणार…शरद पवार खरंच असं म्हणाले? राष्ट्रवादीने मांडली बाजू

    मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून शहरांच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदी असताना औरंगाबाद या शहराचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्याची घोषणा केली. त्यानंतर सत्ताबदल होताच शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करत नव्याने शासन निर्णय जारी केला. सरकारच्या या निर्णयाविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन केलं होतं. मात्र उर्वरित राजकीय पक्षांनी या निर्णयाचं समर्थन केलं. या नामांतराविषयी आता पुन्हा नवा वाद उभा राहिला आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नामांतराला विरोध केल्याचं सांगत मी संभाजीनगर नाही, तर औरंगाबादच म्हणणार, असं वक्तव्य केल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिलं होतं. मात्र शरद पवार यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचा खुलासा आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी ट्वीट करत शरद पवारांबाबत प्रसारित झालेल्या बातमीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच हे वृत्त देणाऱ्यांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशाराही दिला आहे. ‘छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांपासून मी आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहेत. साहेबांनी कुठल्याच कार्यक्रमात या शहराच्या नामांतराविषयी आपले मत मांडलेले नाही. एका वृत्तवाहिनीने याबाबत खोडसाळपणा केला आहे. या वाहिनीच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत,’ असं ट्वीट सूरज चव्हाण यांनी केलं आहे.

    निवडणुका आल्या की शरद पवारांचे डायलाॅग सुरु, आम्हालाही सवय झाली; देवेंद्र फडणवीसांनी डिवचलं

    भाजपमध्ये ती गोष्ट करण्याची धमक नाही, शरद पवारांनी देशातलं गणित सांगितलं, विरोधकांच्या एकजुटीवर म्हणाले…

    शरद पवार नक्की काय म्हणाले होते?

    छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवारांनी आपल्या सहकाऱ्यासोबतचा एक किस्सा सांगितला. यावेळी ते म्हणाले की, ‘काल जाफराबादवरून येताना एक सहकारी म्हणाला की मला समृद्धी महामार्ग बघायचा आहे. त्या रस्त्याने आम्ही औरंगाबादला आलो.’ दरम्यान आपल्याकडून बोलण्याच्या ओघात शहराचा उल्लेख औरंगाबाद झाला असल्याचं लक्षात येताच पवार यांनी स्वत:ला दुरुस्त केलं आणि संभाजीनगर म्हणत मला वाद वाढवायचा नसल्याचं सांगितलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed