• Sat. Sep 21st, 2024

ओमप्रकाश तिच्या खोलीत घुसलेला, तिनं धक्के मारुन बाहेर काढलेलं; तरुणीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट

ओमप्रकाश तिच्या खोलीत घुसलेला, तिनं धक्के मारुन बाहेर काढलेलं; तरुणीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मरिन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीची हत्या करून सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजिया याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ओमप्रकाश याने याआधी देखील या विद्यार्थिनीच्या खोलीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आल्याने वसतिगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.वांद्रे येथील पॉलिटेक्निकल महाविद्यालयात शिकणारी अकोल्याची ही १९ वर्षीय विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले वसतिगृहात चौथ्या मजल्यावर राहत होती. सोमवारी तिची परीक्षा संपली आणि दोन दिवसांनी ती आपल्या गावी – अकोला येथे जाणार होती. मात्र मंगळवारी सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजिया हिने तिच्यावर बलात्कार करून हत्या केली आणि नंतर ग्रॅण्ट रोड स्थानकानजीक रेल्वेगाडीखाली आत्महत्या केली. या घटनेनंतर वसतिगृहातील इतर तरुणी, विद्यार्थिनी तसेच प्रशासनाकडून पोलिस याबाबत अधिक माहिती घेत आहेत.

या तरुणीच्या एका मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश याने याआधी देखील पहाटेच्या सुमारास तिच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला खोलीत पाहून विद्यार्थिनीला धक्का बसला. तिने ओमप्रकाशाला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र तो बाहेर जात नसल्याचे पाहून तिने धक्का मारून त्याला बाहेर काढले होते. ही घटना नेमकी केव्हा घडली याची माहिती पोलिस घेत आहेत.

ओमप्रकाश हा सन २००३ पासून या वसतिगृहात काम करीत होता. त्याचा भाऊ देखील येथेच सुरक्षारक्षक आहे. मात्र तो दोनच दिवसांपूर्वी गावी गेला होता. पोलिस त्याचीही चौकशी करणार आहेत. ओमप्रकाश सर्व तरुणीसोबत मैत्रिणीप्रमाणे वागायचा. मी ज्यावेळी मुलीला सोडण्यासाठी यायचो त्यावेळी तो, तुम्ही मुलीची काळजी करू नका. मी तिला काय हवे ते आणून देईन, असे सांगायचा. असा ओमप्रकाश मुलीची हत्या करेल हे माझ्या ध्यानीमनी नव्हते, असे विद्यार्थिनीच्या वडिलांनी म्हटले आहे.
मुंबईत शिकणाऱ्या त्या मुलीनं घरी सगळं सांगितलेलं,अधीक्षकांवर कारवाईची मागणी, वडिलांनी मुंबईत हंबरडा फोडला
वसतिगृहाचा ढिसाळ कारभार

ओमप्रकाश कनोजिया हा माझ्या मुलीला वारंवार मानसिक त्रास देत होता. ही बाब आम्ही वॉर्डनच्या लक्षात आणून दिली होती. मात्र, त्याच्या वागणुकीत सुधारणा होईल, असे सांगण्यात आले. सोमवारी देखील तिने आमच्याकडे तक्रार केली होती. मात्र दोन दिवसांनी ती अकोल्याला येणार असल्याने आम्हीच तिला, दरवाजा बंद करून राहा, असे सांगितले होते. पण त्या दिवशी नको ते घडले, असे सांगत, यासाठी वसतिगृहाचा ढिसाळपणा कारणीभूत आहे, असा आरोप या मुलीचे वडील आणि भाऊ यांनी केला आहे. वॉर्डन आणि वसतिगृहाच्या अधीक्षकांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed