• Mon. Nov 25th, 2024
    Kolhapur :कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, पण इंटरनेट सेवा ३१ तास बंद, नेमकं काय घडलं?

    कोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली कोल्हापूर बंदची हाक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनाने अचानक उग्र रूप धारण केलं आणि पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरात एकच राडा झाला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तब्बल तीन-साडेतीन तास सुरू असलेल्या प्रकारानंतर कोल्हापूर पोलीसांनी अखेर लाठीचार्ज करत आटोक्यात आणला असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कोल्हापुरातील इंटरनेट सेवा ३१ तास बंद राहणार आहे. बुधवार सायंकाळी पाच वाजल्यापासून उद्या गुरुवार (८ जून) रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

    • नेमकं काय घडलं? :

    काल संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा सुरु असताना कोल्हापुरात मात्र काही अल्पवयीन युवकांनी दोन समजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे वादग्रस्त स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्यामुळे कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. काल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत संशयितांना अटक करावी, अशी मागणी केली. तर काही ठिकाणी तोडफोड देखील करण्यात आली होती.

    दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेल्या मुलांवर त्वरित कारवाई करावी, तसेच हिंदू समाजातील कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत आणि अटक केलेल्या कार्यकर्त्यांना सोडावं, अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक कार्यकर्ते पुढे येण्यास सुरूवात केली आणि एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेल्या तरुणांनी शिवाजी चौकातून बिंदु चौकाकडे जाऊन दगडफेक करत तोडफोड करण्यास सुरूवात केली. तर कोल्हापूर पोलिसांनी ही बळाचा वापर करत गर्दी पांगवली.

    Kolhapur News: औरंग्याच्या इतक्या औलादी अचानक महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? : देवेंद्र फडणवीस
    याच वेळी महानगरपालिकेच्या दिशेने दुसरा एक मोठा गट आला येत तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनीही लाठीचार्ज करत आणि अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि काही जणांना ताब्यात घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणत कोल्हापुरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. साधारण 11:30 वाजता सुरू झालेला हा गोंधळ दुपारी 2:30 पर्यंत सुरू होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले असले तरी शहरात तणावपूर्ण शांतता कोल्हापुरात दिसून येत आहे. तर चौकाचौकात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    • नुकसानीचे पंचनामे करण्यास लवकरच सुरुवात होणार :

    वातावरण अचानक बिघडत असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना सांगण्याचे आवाहन केले, मात्र आक्रमक झालेल्या तरुणांनी दगडफेक करत तोडफोड करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनीही लाठीचार्ज केला तर काही ठिकाणी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते तर संपूर्ण स्थितीवर पोलिसांची करडी नजर असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलीसांना यश मिळत आहे. तसेच संबंधितांवर करवाई करण्यात येणार असून नुकसानीचे पंचनामे करण्यास लवकरच सुरूवात करणार असल्याचे सांगितले. तसेच सोशल मीडियावरील कोणतेही चुकीचे मेसेज आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

    हजारोंचा मोर्चा धडकला, पण कोल्हापुरात पोलिसांची कणखर भूमिका, परिस्थिती कशी नियंत्रणात आणली IG म्हणाले…

    • पुढील 31 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद :

    तर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी देखील संपूर्ण शहरात गस्त घालून संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आले असल्याचे सांगितले आहे. सध्या कोल्हापुरात अतिरिक्त पोलीस दलही बोलवण्यात आले. संबंधितांवर कारवाई करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे. तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर कोल्हापुरातील इंटरनेट सेवा आज 5 वाजल्यापासून पुढील 31 तासांसाठी इंटरनेट सुविधा ही बंद करण्यात येत आहे.

    • महापालिकेकडून चप्पल गोळा करण्याचे काम सुरू :

    दरम्यान कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चप्पल पडल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील चप्पल गोळा करण्याचे काम सुरू केले. तसेच अनेक सामाजिक संस्थांनी देखील थकलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना पाणी देण्यासाठी पुढे सरसावले असून थोड्याच वेळात पालकमंत्री दीपक केसरकर देखील कोल्हापुरात दाखल होणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed