आपला पगार थकवल्याने मजुर अरबाज हा चांगलाच संतापला होता. त्यानंतर त्याने रागाच्या भरात ठेकेदाराचा भाऊ मोईन मोहम्मद (38) याच्यावर वाद घालण्यास सुरूवात केली. आरोपीने लाकडी फळीने डोक्यात, चेहऱ्यावर, मानेवर वार करत मोईन मोहम्मदची हत्या केली आणि फरार झाला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ आवेश फारुख याने हत्येप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्याकरिता पोलिसांची तीन पथके नेमण्यात आली.
आरोपी मुळचा बिहार येथील असल्याची माहिती समोर आल्याने तो पळून जाण्याची शक्यता होती. मात्र आरोपी अरबाज याचा मोबाइल चोरीला गेल्याने त्याचे लोकेशन अंधेरीच्या जुहू परिसरात होते. आरोपीजवळ मोबाईल नसल्याने आणि त्याला ओळखणारे कोणीही नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली. जुहू परिसरात लोकेशन आरोपीचे मोबाइल आढळल्याने पोलिसांचे एक पथक जुहू परिसरात तपास करत होते. मात्र तो मोबाईलही बंद झाला. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली होती. त्याचप्रमाणे आरोपी पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर आरोपी अरबाजला अटक करण्यात आली. मजुरीचे पैसे थकवल्याने आरोपी अरबाज याने ही हत्या केल्याची माहिती वसईच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी दिली.