मुंबई, दि. ५ : लोकसंख्येचा वाढता वेग पाहता जैवविविधता संवर्धनाचा वेग कमी आहे. अशा परिस्थितीत मानवाने स्वत:चा विचार न करता पर्यावरण रक्षणाचाही विचार करावा. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनाचे काम आनंद, ऊर्जा आणि उत्साह निर्माण करणारे आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण आणि पोषण करावे, असे आवाहन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे आयोजित आभासी प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनीता सिंग, अपर मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, शोमिता बिस्वास, क्लेमेन्ट बेन आदी उपस्थित होते. मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रदर्शनाची पाहणी करून ‘ग्रीन स्टेप’ या पॉइंटवर सेल्फी घेतली.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिवस पर्यावरण संवर्धनाचे संकल्प करणारा दिवस आहे. वन विभागाने आयोजित केलेल्या आभासी प्रदर्शनाची संकल्पना नाविन्यपूर्ण आहे. अशाच प्रकारे वन विभागाने प्रत्येकाच्या मनामनांत वन विभागाचे महत्व रुजवावे. सर्वे ऑफ इंडियाने अलिकडे केलेल्या सर्वेक्षणात राज्यात २५५० चौरस किलोमीटर हरित क्षेत्र वाढले आहे. याशिवाय १०४ चौरस किलोमीटर कांदळवनाची भर पडली आहे. कांदळवनाचा उपक्रम आता देशभर राबविण्यात येणार आहे. तसेच वाघांच्या संख्येतही भर पडली आहे. आता वन विभागाच्या माध्यमातून ‘अमृत वन, पंचायत वन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कामात प्रत्येक नागरिकाचा सहभाग मोलाचा आहे. शुद्ध हवा मिळण्यासाठी प्रत्येकाने लावलेले एक रोप सुद्धा भव्य- दिव्य काम ठरणार आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
आभासी प्रदर्शनाचे उद्घाटन
मंत्रालयातील वन विभागाच्या डिस्प्लेमध्ये पर्यावरण व वन्यजीव संवर्धन तसेच पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी नवीन फ्रेम तयार करण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना वन आणि पर्यावरणाविषयीची माहिती देण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे स्वरूप मिआयामी (आभासी) असल्याने त्यात नैसर्गिक वनांचा आभास होईल. तसेच एका आभासी घड्याळ्याच्या माध्यमातून वेळेबरोबर होणारे नैसर्गिक घटनाक्रम व त्यात बदल दर्शविले जाणार आहेत.
000
गोपाळ साळुंखे/ससं/