• Sat. Sep 21st, 2024
पोलीस उपनिरीक्षकाने सीक लिव्ह टाकली, बाप-मेहुण्यासोबत प्लॅन, जळगावातील साडेतीन कोटींच्या दरोड्याचा उलगडा

जळगाव : संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलासाठी आव्हान असलेल्या जळगाव शहरात घडलेल्या दरोड्याच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या ३६ तासात उलगडा करून तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. या दरोड्याच्या घटनेत संशयितांनी तब्बल १७ लाख रुपयांची रोकड आणि ३ कोटी ६० लाख रुपयांचे दागिने असा मुद्देमाल लांबविला होता. हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या जळगावतील मेहुणा आणि वडिलांना सोबत घेत हा दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. शंकर रमेश जासक असे अटकेतील पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्याचे वडील रमेश राजाराम जासक आणि मेहुणा मनोज रमेश सूर्यवंशी असे इतर दोघांची नावे आहेत.

जळगाव शहरातील कालींका माता मंदिर परिसरात असलेल्या गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेच्या शाखेवर दरोडा पडल्याने जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सकाळी ९ वाजता शाखा उघडण्यात आल्यानंतर कार्यालयीन चार ते पाच कर्मचारी उपस्थित होते. सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दोन जण डोक्यात हेल्मेट घालून बँकेत घुसले. बँकेत हजर असलेल्या कर्मचार्‍यांना बेदम मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल हस्तगत केला. त्यानंतर धमकावत सर्व कर्मचार्‍यांना कार्यालयातील शौचालायत कोंबून ठेवले.

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावला, तीन सख्ख्या भावांचा मृत्यू
त्यानंतर बँक मॅनेजर राहूल मधुकर महाजन यांच्याकडे जाऊन लॉकरच्या चाव्या मागितल्या. महाजन यांनी प्रतिकार केल्यानंतर एका दरोडेखोराने हातात असलेल्या धारदार चाकून मॅनेजरच्या मांडीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. बँकेतील कर्मचारी नयन गिते यांच्यावर देखील वार केल्याने हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर दोन्ही दरोडेखोरांनी मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून लॉकर उघडवून घेतले. लॉकरमध्ये ठेवलेली ३ कोटी ६० लाख रूपयांचे दागिने आणि १७ लाख रूपयांची रोकड असा एकूण ३ कोटी ७७ लाख रूपयांचा ऐवज आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर चोरून नेला. त्यानंतर बँक मॅनेजरचीच दुचाकी घेऊन ते पसार झाले.

दरोडेखोरांनी जळगाव शहराच्या बाहेर बँक कर्मचाऱ्यांचे जप्त केलेले मोबाईल तसेच बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर हा एका नाल्यात फेकून दिला होता. त्यानंतर ते पसार झाले होते. पोलिसांनी डीव्हीआर जप्त केला होता. मात्र, पाणी गेल्यामुळे त्यातून माहिती संकलन करण्यासाठी पोलिसांना मोठ्या अडचणी आल्या. तर एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दुचाकीवरून जात असलेले दोन दरोडेखोर कैद झाले होते. एवढाच धागा पोलिसांकडे होता आणि याच आधारावर संपूर्ण यंत्रणा काम करत होती.

परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, मुबारक तडवी ,परीस जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, विजय निकम, किरण वानखेडे, मुकुंदा गंगावणे, अमोल विसपुते, गिरीश पाटील, अश्विन हडपे अभिजीत सैंदाणे, सुनील पवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी या सर्वांची पथके जळगाव जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात गुन्ह्यात तपास करण्याचे अहोरात्र काम करत होते.

पॅरासिटामॉल कॉम्बिनेशनसह १४ प्रकारच्या औषधांवर बंदी; माणसांसाठी धोकादायक, पाहा औषधांची यादी
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला मनोज रमेश सूर्यवंशी हा स्टेट बँकेमध्ये करार पद्धतीने ऑफिस बॉय म्हणून नोकरीला आहे. त्याला बँकेतील सर्व गोष्टींची माहिती होती, त्यानेच रेकी करून याबाबत त्याचे कर्जत येथे पोलीस उपनिरीक्षक असलेला शंकर जासक याला माहिती पुरवली होती. तब्बल १५ दिवस शंकर जासक याने प्लॅन करुन तब्बल १५ दिवस दरोड्याचा प्लॅन तयार केला आणि त्याचे वृध्द वडील आणि त्याचा मेहुणा मनोज यांना सोबत घेत दरोडा टाकला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

अटकेतील शंकर जासक हा रायगड जिल्हा पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक आहे. त्याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यामुळे दोन वर्ष त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो नुकताच पुन्हा कर्तव्यावर हजर झाला होता. मात्र, एक वर्षापासून तो वैद्यकीय रजेवर असून याच काळात त्याने हा दरोडा टाकल्याचेही चौकशीत समोर आलं आहे. दरोडा टाकल्यानंतर संपूर्ण रोकड आणि दागिने शंकर हा त्याच्यासोबत कर्जत येथे घेऊन गेला होता. त्या ठिकाणाहूनच त्याला जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या पथकाने अटक करत एकूण रोकड पैकी १६ लाख ४० हजार ३७० रुपये तसेच ३ कोटी ६० हजार रुपयांचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करून आज जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यात रमेश जासक याला न्यायालयीन कोठडी तर शंकर जासक आणि मनोज सूर्यवंशी यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशेष या गुन्ह्यात पोलीस महासंचालक स्वतः जातीने लक्ष घालून होते. ते जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याशी फोनवरून संपर्कात होते तसेच गुन्ह्याच्या तपासासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. तसेच खुद्द पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक संदीप गावित यांच्यासह प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम या गुन्ह्याच्या तपासात काम करत होती.

शनिपेठ पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा यासह पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गुन्ह्याच्या तपासात रवाना करण्यात आलं होतं. पोलीस महासंचालकांचे गुन्ह्याकडे लक्ष असल्याने जिल्हा पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचारी भूक, तहान आणि झोप सर्व विसरून काम करत होते. अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर गुन्ह्याचा उलगडा केला आणि तीन संशयितांना गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमालासह अटक केली. गुन्ह्याचा जलद गतीने उलगडा केल्यामुळे जिल्हा पोलीस दलाचे खुद्द पोलीस महासंचालकांनी अभिनंदन केलं असून बक्षीस जाहीर केलं आहे. अवघ्या ३६ तासातच या गुन्ह्याचा उलगडा केल्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाची कॉलर पुन्हा टाइट झाली आहे.

अनिष्ट रुढी आणि परंपरा झुगारल्या, अकोल्यातील विधवा, घटस्फोटित महिलांनी केली वडपूजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed