• Mon. Nov 25th, 2024

    ‘शासन आपल्या दारी’ व्हाया रुग्णालय, भूसंपादनाचा मिळवून दिला लाभ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 2, 2023
    ‘शासन आपल्या दारी’ व्हाया रुग्णालय, भूसंपादनाचा मिळवून दिला लाभ – महासंवाद

    शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन राज्यात 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’हे अभियान राबविण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा हे वेळोवेळी विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन सर्व विभागप्रमुखांना मार्गदर्शन करीत आहे. या अभियानात धुळे जिल्ह्यात 1 लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार विविध खातेप्रमुख आपल्याकडील योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

    सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास, धुळे प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे या आपल्या सकारात्मक कार्यशैलीमुळे प्रसिद्ध आहेत. राज्य शासनाच्या सुरु असलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमातून त्यांनी आगळा वेगळा आदर्श घालून देत खऱ्या अर्थाने शासन लाभार्थ्यांच्या दारापर्यंत नेले आहे.

      तापी नदीवरील सुलवाडे-जामफळ-कनोली ही उपसा सिंचन योजना महत्वाकांक्षी असून धुळे जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरणार आहेत. त्यामुळेच प्रधानमंत्री कार्यालयाचे या योजनेवर देखरेख आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी स्वतः लक्ष देत या योजनेतील भूसंपादनाच्या कामाला गती दिली आहे.

    सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजने अंतर्गत मौजे कुंडाणे (वे.) ता. जि. धुळे येथील भूसंपादन प्रस्ताव क्र. 81/2018 यातील संपादीत गट नं 9/2/अ चे मूळ जमीन धारक भागवत उत्तम पाटील व गट नं 9/4 यातील मूळ जमीन धारक उत्तम यादव पाटील हे मयत असल्याने त्यांच्या वारसांकडून संपादित क्षेत्राचा मोबदला मिळण्यासाठी मे. दिवाणी न्यायालय, धुळे यांचेकडील कायदेशीर वारस तक्ता श्रीमती धोडमिसे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धुळे यांचे कार्यालयात सादर केला होता. त्यानुसार भूसंपादन अधिकारी यांच्याकडून सर्व कागदपत्रांची तपासणी करुन, सर्व संबंधीतांना उपरोक्त गटातील संपादीत क्षेत्राचा मोबदला स्वीकारण्यासाठी कार्यालयात उपस्थित रहाणेसाठी कळविण्यात आले होते.

      त्यानुसार दि. 1 जून, 2023 रोजी सर्व संबंधीत भूसंपादन अधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या कार्यालयात उपस्थित राहीलेत.  परंतु त्यापैकी सदर दोन्ही गटांत वारस असलेले श्री. बबलु भागवत पाटील हे प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने ते जवाहर शासकीय रुग्णालय, धुळे येथील अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याने ते कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्याचे संबंधीतांच्या नातेवाईकांनी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.

      त्याअनुषंगाने श्रीमती धोडमिसे यांनी वस्तुस्थितीची सर्व माहिती घेऊन त्यांचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तात्काळ जवाहर शासकीय रुग्णालय, धुळे येथे जाऊन परिस्थितीची पाहणी करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार कार्यालयातील कर्मचारी डी. बी. पाटील (अव्वल कारकून) व सुरेश वानखेडे यांनी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करुन रुग्ण बबलू भागवत पाटील यांच्या प्रकृतीची विचारणा केली. वैद्यकीय अधिकारी यांनी परवानगी दिल्याने बबलू भागवत पाटील यांच्या नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचारी यांच्यासमोर जमीन मोबदलाच्या आवश्यक कागदपत्रावर श्री. बबलू पाटील यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येऊन पुढील कार्यवाही केली. प्रशासनाच्या या कामगीरीमुळे खऱ्या अर्थाने श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी “शासन आपल्या दारी’’ चा प्रत्यक्ष प्रत्यय आणून दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *