मुंबई, दि. १ : “आपण सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छ, आरोग्यदायी मुंबई बनविण्याचा प्रयत्न करू या”, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते स्थानिक लाभार्थ्यांना एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई शहर जिल्ह्यातील माटुंगा (प) येथील सिटी ऑफ लॉस एंजेलिस शाळेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आयोजित या कार्यक्रमात स्थानिक आमदार सदा सरवणकर, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, शासनामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. तथापि या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई शहरात विविध घटकांतील रहिवाशांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. युवकांसाठी रोजगार, महिलांच्या हाताला काम, आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, कोळीवाड्यांसाठी फूड कोर्ट, ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुंबई शहरातील उंदिरांची संख्या कमी करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
आमदार सदा सरवणकर यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. तर जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी प्रास्ताविकाद्वारे विविध योजनांबाबत माहिती दिली. अशाच प्रकारचा उपक्रम दर महिन्याला आयोजित करून वंचित घटकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. या अनुषंगाने शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात आल्या आहेत. शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी तसेच विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ दिले जात आहेत.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाद्वारे प्रामुख्याने दिव्यांगांना साहित्य वितरण, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रमाणपत्र तसेच हयातीचा दाखला भरून घेणे, मतदार ओळखपत्र, बचत गटांना प्रमाणपत्र, अनाथ बालकांना प्रमाणपत्र, घरेलु सन्मानधन योजनेअंतर्गत धनादेश, शिधापत्रिका, शैक्षणिक कर्ज प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड वाटप तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र वितरण आदी योजनांचा लाभ एकाच छताखाली प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आला.
000
बी.सी.झंवर/विसंअ/