खासदार बाळू धानोरकर यांच्या रक्तात संसर्ग पसरल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला. गुडगावच्या मेदांता रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र कित्येक प्रयत्नांनंतरही अखेर त्यांचे संक्रमण थोपवून ब्लडप्रेशर योग्य स्तरावर न आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती डॉ. वझे यांनी दिली.
डॉ. सागर वझे यांनी नेमकं काय सांगितलं?
१९ मेपासून बाळू धानोरकर यांना पोटात दुखायला लागलं आणि उलट्यांचा त्रास होत होता. त्यांची सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा गॉलब्लॅडर स्टोन अर्थात पित्ताशयात खडे असल्याचं निदान झालं. प्राथमिक उपचार करुन त्यांना नागपुरातील अरिहंत रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे ३६ तास ते नॉर्मल होते. व्यवस्थित चालत-बोलत होते, अशी माहिती डॉ. सागर वझे यांनी दिली.
२७ तारखेला पहाटे अचानक बाळू धानोरकर यांचं ब्लड प्रेशर आणि पल्स लो होत गेली. ते वर आणण्यासाठी त्यांना औषध देण्यात आली. त्यानेही दिलासा न मिळाल्याने त्यांना वेंटिलेटरी सपोर्ट देण्यात आला. त्यांच्या पित्ताशयाला सूज आणि संसर्ग होऊ लागला. त्यांच्या आतड्याला आणि रक्तात संसर्ग भिनू लागला. याला सेप्टिसीमिया म्हणतात. त्यामुळे केसांपासून नखापर्यंत प्रत्येक अवयवावर परिणाम होतो, असे डॉ. सागर वझे यांनी सांगितलं.
संपूर्ण शरीरावर परिणाम होत असल्याने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात डॉ. रणधीर सूद यांच्या देखरेखीखाली अॅडमिट केलं. एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना दिल्लीला हलवण्यात आलं. त्यांना हायर अँटिबायोटिक्स देण्यात आले. डायलिसीस युनिटला फिल्टर जोडण्यात आले. पहिल्या २४ तासात हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. संसर्ग फुफ्फुसात पसरल्याने त्यांना इक्मो देण्यात आला. परंतु ब्लड प्रेशर आणि पल्स पूर्ववत होत नव्हती. हळूहळू कार्डिअॅक फेल्युरने त्यांचा मृत्यू झाला.