• Sun. Sep 22nd, 2024

‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ उपसमितीकडून अभिनंदन

ByMH LIVE NEWS

May 30, 2023
‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ उपसमितीकडून अभिनंदन

मुंबई, दि. 30 : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)कडून प्रशिक्षण घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीकडून अभिनंदन करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सारथी संस्थेच्या १०३ गुणवंत विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली.आणि  सारथी संस्थेच्या एकूण ३९ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम यादीत निवड झाली आहे. ही अभिमानाची बाब आहे. या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सत्कार समारंभ आयोजित करावा, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे  प्रलंबित असणारी प्रकरणे  व्याज परतावा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक निधीची तरतूद करावी, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

मा. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका संदर्भातील प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.असेही या बैठकीत सांगितले. तसेच मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यासाठी यावर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

00000

काशीबाई थोरात/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed