• Sat. Sep 21st, 2024

महिलांसाठी ‘आई’ पर्यटन धोरण राबवण्यास मान्यता – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

ByMH LIVE NEWS

May 30, 2023
महिलांसाठी ‘आई’ पर्यटन धोरण राबवण्यास मान्यता – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 30 : महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराच्या संधी तसेच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा, याकरिता महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘आई’ हे महिला केंद्रित (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, ‘आई’ पर्यटन धोरणांतर्गत महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती व प्रवास आणि पर्यटन विकास या पंचसूत्रीचा अवलंब करून महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराच्या संधी तसेच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा, याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येतील, त्या दृष्टीने या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता कार्यदलाची  स्थापना करण्यात येईल.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, या धोरणांतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या त्यांनी चालविलेले हॉटेल, रेस्टॉरंट, टूर अॅन्ड ट्रॅव्हल एजन्सी इ.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी बँकांमार्फत घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याजाची १५  लाखापर्यंतच्या मर्यादेत व ७ वर्ष किंवा ४.५ लाख रुपयांची मर्यादा (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) प्रतिपूर्ती करण्याकरिता विहित अटींच्या अधीन राहून योजना आखण्यात येईल. तसेच, पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिला टूर ऑपरेटरर्स यांचा वार्षिक विमा हप्ता पहिले ५ वर्षे शासनामार्फत भरण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १ ते ८ मार्च या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्स, युनिट्समध्ये सर्व महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये ५० टक्के सूट देण्यात येईल. वर्षभरात एकूण ३० दिवस महामंडळाच्या सर्व रिसॉट्समध्ये महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये ५० टक्के सूट देण्यात येईल, तसेच महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेसचे आयोजन करण्यात येईल व महिला बचतगटांना महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये हस्तकला, कलाकृती प्रक्रिया केलेले पदार्थ इत्यादीच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. शासनस्तरावर निश्चित करण्यात आलेल्या पर्यटनस्थळी महिला बाईक टॅक्सी सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. हे धोरण पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागांच्या विविध योजनांशी समन्वय साधून राबविण्यात येईल. याकरिता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष तयार करण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

*******

संध्या गरवारे/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed