रवींद्रन कुटुंबीयांकडे असलेल्या कुत्र्याला अंघोळ घालण्यासाठी रणजित आणि कीर्ती हे दोघेजण प्रत्येक आठवड्याच्या रविवारी दावडी येथील तलावावर जात होते. या रविवारी देखील दोघे बहीण भाऊ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याला अंघोळ घालण्यासाठी तलावाच्या काठी गेले होते. यादरम्यान, किर्तीचा पाय घसरला आणि ती तलावाच्या पात्रात पडली. किर्तीला वाचवण्यासाठी गेलेला रणजित तलावाच्या पात्रात उतरला आणि तोही बुडू लागला. दोघेही मदतीसाठी आरडाओरड करत होते. त्यांचा आवाज ऐकून तलावाच्या बाजूला राहणाऱ्या एका उत्तर भारतीय नागरिकाने दोघांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली होती. मात्र,दोघांकडूनही बचावासाठी योग्य प्रतिसाद मिळाला नाही.
काही वेळाने दोघेही दिसेनासे झाल्यानंतर या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना देण्यात आली. तेथील पोलीस पाटीलांनी मानपाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मानपाडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. ही भावंड डोंबिवली पाश्चिम येथील उमेश नगर परिसरातील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली असून त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त गावी गेलेले आहे. सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, पोलीस अधिकचा तपास करत आहेत.