• Mon. Nov 25th, 2024

    स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त २८ मे रोजी पर्यटन विभागाच्या पुढाकारातून पदयात्रा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 25, 2023
    स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त २८ मे रोजी पर्यटन विभागाच्या पुढाकारातून पदयात्रा – महासंवाद

    मुंबई, दि. २५ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन २१ ते २८ मे २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीदिनी दि. २८ मे रोजी दादर, मुंबई येथे पदयात्रा व प्रकाशोत्सवाचे आयोजन पर्यटन विभाग, सावरकर राष्ट्रीय स्मारक व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आदींसह मुंबई व लगतच्या महानगरांतील सांस्कृतिक संस्था-संघटना, शैक्षणिक संस्था, नागरिक-कार्यकर्ते यांची उपस्थिती असणार आहे.

    या अभिनव उपक्रमामध्ये दि. २८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता दादर पश्चिम येथील सावरकर सदन येथून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील सावरकरांच्या पुतळ्याजवळ पदयात्रा येऊन स्वा. सावरकरांना मानवंदना देईल व त्यानंतर स्वा. सावरकर लिखित ‘जयोस्तुते’ गीताच्या सामूहिक गायनाने पदयात्रेची सांगता होईल. या पदयात्रेला यशस्वी करण्याकरिता पर्यटन विभागासह सावरकर राष्ट्रीय स्मारक, विवेक व्यासपीठ व इतर अनेक संस्था-संघटनांतर्फे जनसंपर्क सुरु आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार यांसह अनेक ठिकाणांहून मोठ्या संख्येने या पदयात्रेकरिता नागरिक उपस्थित राहणार आहेत.

    दादर – पश्चिम येथे बालमोहन विद्यामंदिराजवळ असलेले सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे त्यांच्या अखेरच्या काळात वास्तव्य होते. त्यामुळे या ऐतिहासिक स्थानाचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व मोठे आहे. तसेच, सावरकरांच्या विचार व जीवनकार्याचा प्रचार-प्रसारासाठी दादर पश्चिम येथील सावरकर राष्ट्रीय स्मारक ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यामुळे या दोन स्थानांदरम्यानची ही पदयात्रा महत्त्वाची आहे. तसेच, वीरभूमी परिक्रमा व सावरकर विचार जागरण सप्ताहाच्या माध्यमातून राज्य शासनाद्वारे प्रथमच सावरकरांच्या जीवनकार्याचा इतक्या व्यापक स्तरावर गौरव होत असून याकरिता महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग व विवेक व्यासपीठाने पुढाकार घेतला आहे.

    ‘वीरभूमी परिक्रमा’ व ‘सावरकर विचार जागरण सप्ताह’

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य लाभलेल्या महाराष्ट्रातील ठिकाणांचे जसे की भगूर [सावरकरांचे जन्मस्थान], नाशिक, पुणे, सांगली, रत्नागिरी व मुंबई येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास करत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर टुरिझम सर्किट’ निर्मितीचा संकल्प पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नुकताच घोषित केला होता. तसेच, या सर्किटला ‘वीरभूमी परिक्रमा’ असे नावही देण्यात आले होते. यासह सावरकरांच्या जीवनकार्याला अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता पर्यटन विभाग व विवेक व्यासपीठाच्या माध्यमातून ‘विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत दि. २१ मे ते २८ मे दरम्यान येथे उल्लेखलेल्या सर्व ठिकाणी मिळून तब्बल ४० हून अधिक कार्यक्रम होत असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

    ****

    संध्या गरवारे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *