• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ByMH LIVE NEWS

May 25, 2023
महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी दि. २५ : महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षमपणाने गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलीस हे देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी पोलीस दलाला जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेली १० बोलेरो वाहने, २० मोटार सायकल व चार बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, या वाहनांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास निश्चितपणाने मदत होईल. पोलिसांच्या घर निर्मितीला त्याचबरोबर त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. नैसर्गिक आपत्तीमध्ये पोलीस सक्षमपणाने कार्यरत राहिल्यामुळे नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. नागरिकांना पोलिसांची भीती न वाटता त्यांच्या कामाचा चांगला अनुभव यावा यासाठी त्यांनी कार्यरत रहावे. 55 वर्षावरील वाहतूक पोलिसांना शासनाने बंदोबस्ताबाबत सवलत दिली आहे. पोलिसांना अनेक वेळेला आनंदाचे क्षण त्यांच्या कुटुंबियासोबत घालवावयाचे असतात तथापि कार्यबाहुल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली असल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

याप्रसंगी पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यासह पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed