• Sat. Sep 21st, 2024

भिवापूर हत्याकांडाचा उलगडा! मुलीनेच दिली वडिलाच्या हत्येची सुपारी; ५ लाखांत ठरला व्यवहार

भिवापूर हत्याकांडाचा उलगडा! मुलीनेच दिली वडिलाच्या हत्येची सुपारी; ५ लाखांत ठरला व्यवहार

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : पोटच्या मुलीनेच वडिलाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली. भिवापूरमधील पेट्रोल पंप दरोडा व हत्याकांड प्रकरणात सुपारी देणाऱ्या मुलीला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे. प्रिया किशोर माहुरतळे-सोनटक्के (वय ३५, रा. सर्वेशनगर, दिघोरी), असे अटकेतील मुलीचे; तर दिलीप राजेश्वर सोनटक्के (वय ५५, रा. कोलारी साठगाव, ता. भिवापूर), असे मृताचे नाव आहे.अशी आहे घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. पेट्रोल पंप, शेती व घराचा मालकी हक्क त्यांच्या पत्नीकडे होता. त्यामुळे ते पत्नी व मुलगी प्रियाचा शारीरिक छळ करायचे. घरखर्चासाठी त्यांना पैसेही देत नव्हते. दोघीही घरभाड्यापोटी मिळणाऱ्या नऊ हजार रुपयांतून उदरनिर्वाह करायच्या. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंप, शेती आणि घर नावे करण्यासाठी दिलीप यांनी पत्नीच्या मागे तगादा लावला. त्यांच्या पत्नीने नकार दिला. २ मे रोजी दिलीप यांनी पत्नी व मुलीला अमानुष मारहाण केली. दोघींना घराबाहेर काढण्याचाही प्रयत्न केला. वडिलाच्या सततच्या त्रासाला प्रिया कंटाळली. तिने शेख अफरोज ऊर्फ इमरान मौलाना शेख हनिफ (वय २२, रा. ताजबाग) याला वडिलाचा खून करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली. खून केल्यानंतर काही दिवसांनी पाच लाख रुपये मिळतील, असेही तिने अफरोजला सांगितले. अफरोज याने साथीदार मोहम्मद वसीम लाल मोहम्मद (वय २९, रा. खरबी) व जुबेर खानला या दोघांना दिलीप यांच्या खुनाच्या कटात सहभागी केले. पाच दिवसांपर्यंत त्याने भिवापूर येथील पेट्रोल पंपावर रेकी केली.

सकाळीच घुसले केबिनमध्ये

१७ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तोंडाला कापड बांधून अफरोज व त्याचे साथीदार पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये घुसले. यावेळी दिलीप आणि पंपावरील नोकर नान्हे हे दोघेही पैसे मोजत होते. अफरोजने त्यांच्यादिशेने पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र गोळी पिस्तूलातच अडकली. त्यानंतर अन्य दोघांनी चाकूने दिलीप यांच्यावर १५पेक्षा अधिक वार केले. नान्हे यांच्यावरही वार केले. घटनास्थळीच दिलीप यांचा मृत्यू झाला. दिलीप यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच १ लाख ३४ हजारांची रोख घेऊन तिघेही पसार झाले. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी खून व दरोड्याचा गुन्हा दाखल करून अफरोज व त्याच्या साथीदारांना अटक केली. तिघांची २४पर्यंत पोलिस कोठडी घेतली.

बाईकवरुन आले, गोळीबार केला, पेट्रोलपंप मालकाला लुटून भोसकलं, नागपूर हादरलं
प्रियाला अटक

याप्रकरणात सुरूवातीपासूनच पोलिसांना सुपारी किलिंगचा संशय होता. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, भिवापूरचे ठाणेदार जयपालसिंग गिरासे, साहाय्यक पोलिस निरीक्षक शरद भस्मे यांनी कसून तपास सुरू केला असता प्रियानेच पाच लाख रुपयांमध्ये सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी प्रियाला अटक केली. वडिलांच्या त्रासाला कंटाळूनच हत्येची सुपारी दिल्याचे तिने मान्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed