• Mon. Nov 25th, 2024
    कुणी शेतकऱ्याचा लेक, कुणाच्या वडिलांचा चहाचा गाडा, पोरांनी आई-बापाचं पांग फेडलं!

    संगमनेर : यूपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यात देशातील अनेक मुलांना घवघवीत यश मिळालं. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘संगमनेरी आणि सव्वाशेरी’ अशी म्हण संगमनेर परिसरात प्रचलित आहे. हेच संगमनेरी आता यूपीएससीच्या परीक्षेत देखील चमकले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील तिघांनी यश मिळविले. यात सुकेवाडी गावचे सुपुत्र मंगेश पाराजी खिलारी, मांची गावचे सुपुत्र स्वप्निल राजाराम डोंगरे आणि पिंपरणे गावच्या कन्या राजश्री शांताराम देशमुख यांचा समावेश आहे. या तिघांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे हे तिघेही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत.

    संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या सुकेवाडी गावातील मंगेश खिलारीने यूपीएससीच्या परीक्षेत देशात ३९६ वा क्रमांक मिळविला. त्याचे वडील पाराजी खिलारी यांचे गावातच छोटेसे चहाचे हॉटेल असून मंगेशची आई संगिता या बिडी कामगार आहेत. मंगेशचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शुक्लेश्वर विद्यालयात झाले. त्यानंतर त्याने अकरावीला शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तेथे अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुढे कला शाखेत पदवीचे शिक्षण पुण्यातील एसपी महाविद्यालयात पूर्ण केले. पुण्यात राहून अभ्यास केला. घरची परिस्थिती बेताची असताना सुद्धा त्याने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी मिळविलेले यश खरोखर कौतुकास्पद आहे.

    इंजिनिअरिंग सोडलं, मुक्त विद्यापीठातून पदवी, मेहनत करत यश मिळवलं, रोशननं आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं
    कोल्हार-घोटी राज्यमार्गावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील मांची येथील स्वप्निल राजाराम डोंगरे हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील राजाराम दामोधर डोंगरे हे महावितरण कंपनीत नाशिक ग्रामीण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून तर आई वैशाली डोंगरे या नाशिक महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत. स्वप्निल डोंगरे यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमध्ये झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण संगमनेर शहरातील दिगंबर गणेश सराफ विद्यालयात झाले. पुढील शिक्षण त्याने पुण्यात पूर्ण केले. त्याने बीई मेकॅनिकल पदवी मिळविली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांनी दिल्ली गाठली आणि वयाच्या २८ व्या वर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७०७ वा क्रमांक मिळविला.

    तसेच संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातील राजश्री शांताराम देशमुखने वयाच्या २५ वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. तिचे प्राथमिक शिक्षण संगमनेरातील डेरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झाले आहे. अकरावी आणि बारावीचे विज्ञान शाखेतून शिक्षण तिने पूर्ण केले. त्यानंतर एमआयटी, पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविली. पुढे तीन वर्ष दिल्ली येथे राहून अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७१९ वा क्रमांक मिळविला. तिचे वडील शांताराम उत्तमराव देशमुख हे माजी सैनिक असून सेवानिवृत्तीनंतर ते शेती करतात. प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचित आहेत. संगमनेरातील या तिन्ही चमकलेल्या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed