• Sun. Sep 22nd, 2024

‘महानिर्मिती भुसावळ ६६० मेगावॅट प्रकल्प’ ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित करण्यासाठी मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न

ByMH LIVE NEWS

May 24, 2023
‘महानिर्मिती भुसावळ ६६० मेगावॅट प्रकल्प’ ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित करण्यासाठी मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न

राज्याच्या स्थापित क्षमतेत ६६० मेगावॅटची भर पडणार; महानिर्मितीचा ४ था सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील संच

नवी दिल्ली, 24 मे 2023 : महानिर्मितीच्या भुसावळ 660 मेगावॅट संच क्रमांक 6 चे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम मेसर्स भेल (BHEL) कंपनी करीत असून या कामांना अधिक जलद गतीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी आज दिल्ली येथे भेल कंपनीचे सी.एम.डी. डॉ.नलिन सिंघल यांची भेट घेतली.

महानिर्मितीच्या भुसावळ  संचाचे  बाष्पक प्रदीपन 30 मार्च 2023 रोजी संपन्न झाले, त्यानंतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून  हा संच माहे ऑक्टोबर 2023 मध्ये कार्यान्वित करण्यासाठी  मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न सुरू असल्याचे  डॉ.नलिन सिंघल यांनी सांगितले.

मेसर्स भेल आणि महानिर्मिती अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत भुसावळ वीज प्रकल्पाच्या विकास कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील वीज प्रकल्प, विद्युत उत्पादन क्षेत्रातील नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान, बदलते निकष, पर्यावरणीय ऱ्हास आणि घडामोडी या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात मेसर्स भेल कंपनीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल डॉ.पी.अनबलगन यांनी भेल कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

महानिर्मिती आणि मेसर्स भेल कंपनी यांचे मागील चार दशकांपासून असलेले सौहार्दपूर्ण संबंध लक्षात घेता आवश्यक ते संपूर्ण सहकार्य महानिर्मितीकडून भेल कंपनीला करण्यात येईल असे डॉ.पी.अनबलगन यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या वीज क्षेत्राच्या दृष्टिकोनातून भुसावळ 660 मेगावॅट हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यावर्षी राज्याच्या ग्रीडमध्ये 660 मेगावॅटची भर पडणार आहे. भुसावळ मधील 660 मेगावॅट क्षमतेचा पहिला आणि  कोराडीच्या 3 संचांनंतर हा महानिर्मितीचा चौथा संच आहे.

याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प), अभय हरणे, मरावीम सूत्रधारी कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक तसेच भेलचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

विशेष वृत्त /.24.05.2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed