सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सचिन अण्णासाहेब जाधव मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोली या गावचा. सचिनचे आई वडील अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोलमजुरी करायचे. सचिनचं शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं, मात्र दहावीत असताना सचिनवरचं आईचं छत्र हरवलं. घरची परिस्थिती नाजूक होती. आपण शिकलो नाही तर आपल्यालाही आई-वडिलां प्रमाणे मोलमजुरी करून आयुष्य जगावं लागेल यामुळे आपण शिकून परिस्थिती बदलायची असा निर्णय सचिनने घेतला. सचिनने स्पर्धा परीक्षेसाठी सहा वर्ष तयारी केली. यात दोन वेळा पीएसआय पद हुकलं. लॉकडाऊन लागलं आणि जबाबदारी पडली. अशावेळी अनेकजण खचून जातात पण सचिनने खचून न जाता चहा नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला. आता तो चहा नाश्त्याच्या व्यवसायातून लाखो रुपये कमावतो आहे.