अजितदादांनी सुनेत्रावहिनींची फिरकी घेतली
बोलण्याच्या ओघात अजितदादांनी लोकसंख्येचे प्रमाण व त्यातील तरुणांचा टक्का व ज्येष्ठांचा टक्का किती प्रमाणात आहे. याची माहिती दिली. ‘सध्या भारतात तरुणांची संख्या मोठी आहे. भारतीयांचे सरासरी आर्युमान २८ वर्षे इतके आहे. देशात ६० पेक्षा जास्त ज्येष्ठांची संख्या १० टक्के आहे. देशात १३ कोटी ५० लाख लोकं ६० वर्षांच्या पुढची आहेत. यामध्ये अजित पवारचाही नंबर लागतो आणि लवकरच सुनेत्राचा सुद्धा लागणार आहे. या वाक्यावर सुनेत्रावहिनींनी हसून दाद दिली. तर उपस्थिांमध्येही खसखस पिकली.
चपटीसाठी विकले पुलाच्या संरक्षक कठड्यावरील भाले…
विरोधी पक्षनेते अजित पवार हे आठवड्यातून एकदातरी बारामतीतील विकासकामांची काळजीपूर्वक पहाणी करत असतात. बाबूजी नाईकवाड्याजवळील नदीपात्रातून कसब्याकडे जाण्यासाठी नवीन पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्यावर लोखंडी सळईच्या भाल्याचे नक्षीकाम करण्यात आले होते. मात्र आज हा पूल पाहताना अजित पवार यांना यातील भाले गायब झाल्याचे लक्षात आले.
याबाबत येथील कार्यक्रमात अजित पवार बोलले. ‘येथील सुरक्षारक्षक भिंतीवर लोखंडी ग्रील बसवले आहे. व त्यावर भाले काढले होते. यातील सगळे भाले चोरीला गेले. मी म्हणालो हे कोण घेऊन जातो. तेंव्हा एकाने सांगितले दादा एक भाला काढला की शंभर रूपये मिळतात. शंभर रूपये मिळाले की ५० रूपयाला एक दारूचा तुकडा म्हणजे चपटी मिळते. एका भाल्यात दोन चपट्या मिळतात. त्याचं भागतं. आपण करतोय काय कशाचा कशाला मेळ नाही, असा किस्सा आज अजित पवार यांनी सांगितला.
नवीन बसस्थानकाचे काम सध्या सुरू आहे. येथे मात्र जे चोरता येणार नाही. ते करण्याचा प्रयत्न करतोय. जीवात जीव असेपर्यंत बारामतीकरांचे भलेच करणार, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.