• Sun. Sep 22nd, 2024

युवकांनी रोजगार देणारे बनावे: उद्योगमंत्री उदय सामंत

ByMH LIVE NEWS

May 21, 2023
युवकांनी रोजगार देणारे बनावे: उद्योगमंत्री उदय सामंत

सातारा दि. २१:  युवकांनी रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे. यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवारामार्फत यशोदा टेक्नीकल कॅम्पस, वाढे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उद्योगमंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, यशोदा टेक्नीकलचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे आदी उपस्थित होते.

सामान्य कुटुंबातील युवकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगून उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले की,  तरुणाईच्या हाताला रोजगार देणे ही सर्वांची जबाबदारी आहे.  जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचे उद्दीष्ट शासनाने ठेवले आहे.  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम गावांगावांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.   गेल्या १० महिन्यात उद्योग विभागाने या योजनेच्या माध्यमातून १३  हजार उद्योजक उभे केले आहे.  तसेच उद्योगांसाठी या काळात ५५० कोटींचे अनुदान दिले आहे. यावर्षी किमान २५ हजार उद्योजक उभे करण्याचे उद्दीष्ट आहे.

सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

सातारा जिल्ह्यातील उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले की, जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्यात येईल.  कामगारांसाठी  रुग्णालय उभारु, त्यासाठी लागणारी जागा उद्योग विभागाकडून देण्यात येईल.  सातारा एमआयडीसीसाठी पंधरा दिवसात प्रादेशिक अधिकारी देण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांना चांगले कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी स्कील सेंटरही उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, विद्यार्थ्याना प्रत्यक्ष नोकरीची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करावेत. दुर्गम व डोंगरी भागातही अशा प्रकारचे मेळावे प्रशासनाने घ्यावते. यासाठी शासनाकडून तसेच पालकमंत्री म्हणून लागणारे सर्व ते सहकार्य करण्यात येईल.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास यश नक्की मिळते, संधी एकदाच मिळते त्याचा फायदा घेता आला पाहिजे,  आज तरुणांना सुवर्णसंधी आहे.  युवकांच्या विकासासाठी व चांगले रोजगार मिळावेत यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन व सहकार्य करु.  युवकांनीही याचा फायदा घ्यावा.  कष्ट करण्यात कमी पडू नये, वेळ वाया घालवू नये,  पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, याची काळजी घ्यावी. आमची मान अभिमानाने ताठ होईल इतकी उंची गाठा आणि सातारच्या वैभवात भर घाला.

यावेळी रोजगार मेळाव्यामध्ये नोकरीची संधी मिळालेल्या उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.  तसेच जिल्हास्तरीय लघूउद्योग पुरस्कारांचे  वितरण व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज वाटपाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed