जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव तालुक्यातील शेंदवणे येथील एका महिलेस प्रसूतीपूर्व कळा येऊ लागल्याने तिला गुरुवारी बिलगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिलेस अधिक त्रास होत असल्याने तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्या महिलेला १०८ रुग्णवाहिकामधून जिल्हा रुग्णालयात नेत असताना तळोदा नजीकच्या हातोडा पुलावर रुग्णवाहिकेचे पुढील टायर पंक्चर झाले. मात्र, संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाने नंदुरबारहून दुसरी रुग्णवाहिका बोलवली होती. ही रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत गर्भवतीला अधिक कळा येत असल्याने पंक्चर असलेल्या रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती झाली.
या महिलेची प्रसूती सुरक्षित झाल्याने नातेवाइकांनी सुस्कारा सोडला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या भंगार तसेच जुनाट रुग्णवाहिकांमुळे आदिवासी महिलेची भर उन्हात वाहनातच प्रसूती होण्याची वेळ आल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेबाबत नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या महिलेला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णवाहिकेतून जिल्हा आरोग्य रुग्णालयात पाठवण्यात आले. तिची प्रसूती डॉ. अंजली अग्रवाल यांनी केली.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या रुग्णवाहिका सुसज्ज ठेवणे अपेक्षित आहे. यामुळे गंभीर रुग्ण अथवा गर्भवती महिलांना पुढील आरोग्य सुविधा मिळणे सोयीचे होते. मात्र, आरोग्य विभागाच्या या रुग्णवाहिका भंगार झाल्या आहेत. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून चांगल्या दर्जाच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामीण जनतेमधून होत आहे.