• Sat. Sep 21st, 2024

नवीन पिढीने संशोधन क्षेत्रात पुढे यावे- अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक

ByMH LIVE NEWS

May 19, 2023

            मुंबई-प्रतिनिधी

संशोधन हे वैयक्तिक स्तरावरील अडचणी, प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुढे येते. वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. भारत हा तरुणाईचा देश आहे. युवा पिढीने ‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्यासाठी संशोधन क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज केले.

            आयआयटी, मुंबई येथील व्हीएमसीसी सभागृहात तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन ॲडव्हान्सेस इन रेडीओलॉजी अँड रेडीओथेरपी 2023’ चे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या तिसऱ्या दिवशी ‘जर्नी ऑफ इंडियन एमआरआय’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन  कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

                 व्यासपीठावर केंद्रीय इलेक्ट्रिक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेल्या समीर (सोसायटी फॉर अप्लाईड माईक्रोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग अँड रिसर्च) संस्थेचे महासंचालक डॉ.पी. एच राव, आयआयटी मुंबई येथील संशोधन आणि विकास शाखेचे प्रमुख प्रा. मिलिंद अत्रे, राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, समीरचे प्रकल्प संचालक राजेश हर्ष, डॉ.तनुजा दीक्षित यांची उपस्थिती होती.                     

            वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचा उपयोग सामान्य जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी होणे गरजेचे असल्याचे मत मांडत श्रीमती सौनिक म्हणाल्या, की समीर संस्थेचे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचे कार्य प्रशंसनीय आहे. या क्षेत्रात नवनवीन अद्ययावत वैद्यकीय साहित्य व उपकरणांची निर्मिती करून देशाला आत्मनिर्भरता प्राप्त करून द्यावी.

             त्या पुढे म्हणाल्या, सामान्य मनुष्याला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन होणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेतील रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचे अनुभवही कथन केले. चर्चासत्रादरम्यान डॉ. मिलिंद अत्रे यांनी आयआयटी, मुंबई येथील संशोधन आणि विकास शाखेमार्फत सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांची माहिती  देत शाखेच्या कार्याचा आढावा घेतला.

               प्रकल्प संचालक श्री. हर्ष यांनी सादरीकरणाद्वारे एमआरआय मशीनचे महत्त्व सांगितले. ‘समीर’ने बनवलेल्या एमआरआय मशीनचे वैशिष्ट्येही सांगितली.  सुरुवातीला समीरचे महासंचालक श्री. राव यांनी समीर संस्थेविषयी माहिती दिली. कोलकाता, मुंबई,  चेन्नई,  गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथील समीरचे केंद्र कार्यान्वित असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यकमाला  विद्यार्थी, संशोधक,  उद्योजक, डॉक्टर उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed