• Mon. Nov 25th, 2024

    एसटीतील दिवे बंद, मोबाइलच्या प्रकाशात काढल्या तिकिटा; महामंडळाच्या कारभारावर प्रवाशांचा संताप

    एसटीतील दिवे बंद, मोबाइलच्या प्रकाशात काढल्या तिकिटा; महामंडळाच्या कारभारावर प्रवाशांचा संताप

    म. टा. वृत्तसेवा, भंडारा : ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ अशा राज्य सरकारच्या योजनांची माहिती गावोगावी पोहचविणाऱ्या एसटीच्या बसेसचा आधार घेतला जातो. एसटी महामंडळाच्या या बसेससाठी योजना जाहीर करण्याची वेळ आली आहे. अनेक बसेस भंगार अवस्थेत असल्याने अनेकदा वाटेतच बंद पडतात. बसमधील दिवेही बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहकांना प्रवाशांच्या मोबाइलच्या प्रकाशात तिकीट काढावे लागत असल्याचे पुढे आले आहे. गोंदिया-तुमसर मार्गावर बुधवारी रात्री प्रवास करणाऱ्यांनी हा अनुभव घेतला.गोंदिया आगारातून बुधवारी सायंकाळी तुमसरला जाण्यासाठी शेवटची एसटी बस निघाली. ही बस साधारण असल्याने प्रत्येक थांब्यावर प्रवासी बसत होते. अंधार झाल्याने एसटीतील दिवे सुरू करण्याची वेळ झाली तरी चालकाने ते सुरू केले नाही. याबाबत वाहकाला प्रवाशांनी विचारले असता दिवे बंद असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे एसटीत पूर्णपणे अंधार पसरला होता. अशा स्थितीत वाहक प्रत्येकाजवळ जाऊन तिकीट काढत होता. अंधार असल्याने काहीही दिसत नसल्याने मग त्या प्रवाशाला मोबाइलचा प्रकाश सुरू करण्याची विनंती करीत होता. एकापासून दुसऱ्यापर्यंत असे करीत संपूर्ण बसमधील तिकीट वाहनाने अशाच पद्धतीने दिल्या. बसमध्ये काही वृद्ध प्रवासी असल्याने अंधारात त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागला. सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजता बस तुमसरला पोहचेपर्यंत प्रवाशांनी हा अंधार अनुभवला.

    राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकार स्थापन झाल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका सुरू करण्यात आला. राज्य सरकारच्या विविध योजना शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी विविध यंत्रणांचा वापर करण्यात आला. त्यातीलच एक म्हणजे एसटी बसेसवर ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ अशी जाहिरात करून योजनांची माहिती पोहचविली जात आहे. अलीकडेच एसटीच्या बसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याने गर्दी वाढली आहे. पण, बसेसची स्थिती अजूनही सुधारू शकलेली नाही.

    धावत्या एसटीची चाकं निखळली, तिरप्या बसमध्ये ३५ प्रवाशांचा जीव टांगणीला, पुणे नाशिक हायवेवर थरार
    ६.३० नंतर उपराजधानीसाठी नाही बस

    राज्याच्या शेवटच्या टोकावर गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया एसटी आगारातून राज्याची उपराजधानी नागपूरला जाण्यासाठी संध्याकाळी ६.३० वाजतानंतर एकही बस नाही. हे अंतर साधारण १५० किमी आहे. त्यामुळे आपातकालीन स्थितीत कुणाला संध्याकाळनंतर नागपूरला जायचे असेल तर त्याला अधिकचे पैसे मोजून खासगी वाहनांचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. तुमसर आगारातून रात्री ८ वाजतानंतर जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडाऱ्यासाठीही बस नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश आगारात हीच स्थिती आहे. एसटी महामंडळाच्या अशा नियोजनामुळे सामान्य प्रवासी मात्र भरडला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed