• Sun. Sep 22nd, 2024

शासन आपल्या दारी अंतर्गत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातर्फे महाशिबिर

ByMH LIVE NEWS

May 18, 2023
शासन आपल्या दारी अंतर्गत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातर्फे महाशिबिर

सोलापूर, दि. 18 (जि. मा. का.) : शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय, उत्तर सोलापूरच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महाशिबिरास पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नॉर्थ कोट प्रशाला, पार्क चौक येथे दि. १८ ते २६ मे या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे महाशिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर आदि दाखले देण्यात येत आहेत. यासोबतच पंचायत समिती व कृषि विभाग यांनीही या महाशिबिरामध्ये सहभाग नोंदवून आपल्या विभागाच्या योजनांचे लाभ वाटप लाभार्थ्यांना केले.

महसूल विभागाचे वतीने एकूण 640 उत्पन्नाचे दाखले, 75 जातीचे दाखले, 48 नॉन क्रिमीलेअर दाखले, 33 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखले, 168 रहिवासी दाखले वितरण करण्यात आले. महसुली विभागाचे वतीने आज एकूण 972 दाखल्यांचे वितरण करण्यात आले व कृषि विभागाचे वतीने कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत 6 लाभार्थी, राष्ट्रीय कृषी विकास योजना याचे 5 लाभार्थी, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना वैयक्तिक शेततळे 5 लाभार्थी, आत्मा अंतर्गत महिला बचत गट 1 लाभार्थी यांना पूर्ण संमतीपत्र याचे वाटप करण्यात आले.

पंचायत समिती उत्तर सोलापूर यांच्यावतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या 22 लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आला. तसेच महाराष्ट्र महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 3 लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा कार्यारंभ आदेश देण्यात आला व दोन लाभार्थ्यांना जनावरांचा गोठा गोठा मंजूर करण्यात येऊन त्याचा कार्यारंभ आदेश देण्यात आला व आपले सरकार अंतर्गत 25 लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. महसूल विभाग, पंचायत समिती विभाग व कृषि विभाग असे तिन्ही विभागाचे वतीने आजच्या शिबिरामध्ये एकूण 1031 लाभार्थ्यांना दाखल्यांचे व वैयक्तिक लाभांच्या योजनेचे वाटप करण्यात आले.

सदर महाशिबिराला जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते काही प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळेस उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 विठ्ठल उदमले, उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ, तालुका कृषि अधिकारी मनीषा मिसाळ, निवासी नायब तहसीलदार विश्वजीत गुंड, नायब तहसीलदार (महसूल) विजय कवडे तसेच महसूल विभागाचे अधिकारी व तहसील उत्तर सोलापूरचे सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व महा ई सेवा केंद्राचे संचालक ऑपरेटर इ. उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed