मुंबई, दि. 18 : “राज्य शासनामार्फत जनकल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागाळातील गरजू नागरिकांपर्यत पोहोचावा, या अनुषंगाने ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ व त्या बरोबर जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठीचे प्रकल्प या सर्व उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीचे नियोजन केले असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सांगितले आहे.
राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त नुकताच लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार’ देऊन राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या योग्य समन्वयातून आणि योग्य नियोजनातून आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून ‘आरोग्यवर्धिनी’ या उपक्रमाची जिल्हा प्रशासनाने कशा प्रकारे यशस्वी अंमलबजावणी केली.या बरोबर सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती देली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शुक्रवार दि. 19 आणि शनिवार दि. 20 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी घेतली आहे.