जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यांतील शिरनेर येथील नारायण वैद्य यांचा मुलगा धर्मराज हा नेहेमी घरात वाद घालायचा. त्याच्या या स्वभावाला घरातील सगळेच कंटाळले होते. घरच्यांनी त्याला कित्येकदा समजावून सांगितले, रागावून पाहिले पण त्याचा स्वभाव काही बदलेना.
१५ मे रोजी म्हणजे सोमवारी धर्मराज वैद्य याने घरात वाद घालायला सुरुवात केली. पण काल नशिबाचे फासे नेमके उलटे पडले आणि वाद हा वाढत हाणामारीपर्यंत गेला. त्याच्या त्रासाला कंटालेल्या वडील नारायण चिमाजी वैद्य, भाऊ कर्णराज नारायण वैद्य आणि मुलगा निर्गुन धर्मराज वैद्य यांनी संगनमतकरून धनराजला शेतात नेवून काठीने हातावर, पायावर मारून हातपाय मोडून त्याचा खून केला.
भानावर येताच आपण काय केले हे तिघांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी धर्मराजचे प्रेत उचलले, लाकडाचे सरण तयार केले आणि त्यावर प्रेत टाकून पेटवून दिले. त्यात धर्मराजचा देह १०० टक्के जळून खाक झाला. पण या प्रकरणाला वाच्यता फुटली आणि पोलिसांना माहिती मिळाली.
पोलीसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास केला आणि तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिघांनी गुन्हा कबूल केला आहे. पो.उप.निरि.एम.बी.स्कॉट यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०१, ३४ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे करीत आहेत. त्रास देणाऱ्या मुलाचा शेवट जन्मदाता बाप, सख्खा भाऊ व पोटच्या मुलानेच केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.