• Sat. Sep 21st, 2024

मित्रांसोबत धरणावर पोहायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

मित्रांसोबत धरणावर पोहायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जळगाव : जळगाव धानवड गावाजवळील धरणात मित्रासोबत पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. करन जयराम पवार (वय-११) रा. चिंचोली ता. जि. जळगाव असे मयत बालकाचे नाव आहे.जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात करन पवार हा वास्तव्याला होता. त्याचे वडील जयराम सुकराम पवार हे ट्रॅक्टर चालक आहे तर आई सुनिता शेतात जावून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी सकाळी आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी चारही भावंडे घरीच होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास करण हा गावातील मित्रांसोबत जवळ असलेल्या धानवड गावानजीकच्या धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही बाब सोबत असलेल्या तीन मित्रांना समजल्यानंतर त्यांनी आरडाओरड करत गावाकडे धाव घेतली.

माहिती मिळाल्यावर गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही पट्टीच्या पोहणाऱ्या तरूणांनी पाण्यात उडी घेवून करनचा मृतदेह बाहेर काढला व खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयात करनच्या आई-वडिलांनी मोठा आक्रोश केला. अकरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चिंचोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.

करन हा आता दुसरीच्या वर्गातून तिसरीत गेला होता. मयत करन पश्चात आई सुनिता, वडील जयराम सुकराम पवार, मोठा भाऊ आकाश, तसचे कविता आणि दुर्गा या दोन बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

घटनेची माहिती कळाल्यावर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती. या घटनेप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रतिलाल पवार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed