दिवाळीमध्ये त्रास सुरु झाला
विले पार्ले टिळक महाविद्यालयाच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन असलेल्या आर्यन रहाते याला ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी ताप आला. तपासणी केल्यानंतर १ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला रक्ताचा कर्करोग झाल्याचं स्पष्ट झालं. त्या आजारमुळं रक्तातील पांढऱ्या पेशींवर परिणाम होत होता. दुर्धर आजाराशी लढा देत असताना आर्यननं दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
आजारामुळं शाळेला नियमित उपस्थित राहता आलं नाही तरी आर्यननं कठोर परिश्रम घेत अभ्यास पूर्ण केला. प्रकल्प आणि गृहपाठ पूर्ण करताना शाळेनं देखील आर्यनला मदत केली. आर्यनला त्याच्या कष्टाचं फळ काल मिळालं. त्याला ९६.४ टक्के गुण मिळाले.
आर्यन सध्या आजारातून बरा होत आहे. आजारी असताना दहावीचे तीन पेपर त्यानं शाळेतून तर तीन पेपर सांताक्रुझच्या सूर्या हॉस्पिटलमधून बेडवरुन दिले. कर्करोग तज्ज्ञांच्या मतानुसार लहान वयातील रक्ताचा कर्करोग म्हणजेच ल्युकेमिया बरा होऊ शकतो,असं त्याची आई स्मिता रहाते म्हणाल्या.
आर्यनला केमोथेरेपीमुळं केस गमाववे लागले पण त्यानं चेहऱ्यावरील हास्य गमावलं नाही आणि आजाराशी लढण्याची जिद्द देखील गमावली नाही, असं स्मिता रहाते यांनी सांगितलं. डिसेंबर २०२२ पासून आर्यनवर उपचार सुरु आहेत. डॉ. निशा अय्यर म्हणाल्या की आम्ही आर्यनबाबत आशा सोडली नव्हती.फेब्रुवारीत आर्यनवर दुसरी एमआरडी टेस्ट करण्यात आली ती निगेटिव्ह आली, असं अय्यर यांनी सांगितलं.