• Sun. Sep 22nd, 2024

दिग्रस शहरातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

ByMH LIVE NEWS

May 13, 2023
दिग्रस शहरातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

यवतमाळ दि, 13: अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस शहरातील विविध अपूर्ण विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागिय अधिकारी आणि तहसिलदार समाधान गायकवाड, जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवणे उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ए या महामार्गाच्या दिग्रस शहरातून जाणाऱ्या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. या महामार्गांमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात यावे. मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महामार्गाचे काँक्रिटीकरण चालू करण्यासही त्यांनी सांगितले.

दिग्रस शहरातील टाऊन हॉलचे बांधकामाचा आढावा घेताना टाऊन हॉलचे डिझाईन करून घेण्यात आले तसेच इतर अतिरिक्त बाबींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी घेऊन वास्तूविशारद यांच्याकडे पाठपुरावा करावा. मंजुरी प्राप्त दोन्ही बाबींचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कंत्राटदार आणि बांधकाम विभागाला दिल्या.

दिग्रस शहरातील हिंदू स्मशानभूमी, भाजी मार्केटच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला दोन्ही बाबीसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून यासाठी तात्काळ निविदा बोलविण्याची कार्यवाही सुरू करावी असे आदेश त्यांनी दिले.

दिग्रस शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन सहा महिने झाले तरी काम सुरु केलेले नाही याबाबत पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. तालुका क्रिडा संकुलचे बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले असून वॉल कंपाऊंड, लॉन टेनिस कोर्ट, सिंथेटिक जॉगिंग  ट्रॅक, तसेच इतर खेळांची मैदाने तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकिला तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed